Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

माझी जन्मठेप - वि. दा. सावरकर | पुस्तक परिक्षण|Mazi Janmthep Book review in Marathi

प्रस्तावना: 

 वि. दा. सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झटणारा आणि आपल्या आयुष्याची आहुती देण्यास तयार असणारा प्रत्येक क्रांतिकारक हा तेवढाच मौल्यवान. या क्रांतिकारकांच्या रक्ताच्या थेंबा थेंबात राष्ट्रभक्ती होती आणि त्यांनी आपले रक्त आणि  देह या भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी वाहिला. या महान क्रांतिकारकांचा व त्यांच्या देशाप्रती  अखंड निस्वार्थ कार्याचा प्रत्यय स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात देशाने घेतला आहे आणि याचाच परिणाम म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला . देशाच्या स्वातंत्र्यासाठी वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेऊन आपले संपूर्ण जीवन देशाच्या हितासाठी वाहणाऱ्या मौल्यवान हिऱ्यांपैकी  एक मौल्यवान हिरा म्हणजे सावरकर असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

           राष्ट्र रक्षणासारखे कोणतेच पुण्य नाही.. कोणतेच व्रत नाही.. कोणताच यज्ञ नाही, म्हणूनच मग देशाला पारतंत्र्यातून बाहेर काढण्यासाठी.. रक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणारे  स्वातंत्र्यवीर सावरकर. बलाढ्य इंग्रजांना न घाबरता जेलमधील यातनांना न जुमानता "अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ? असे आव्हान देणारे .... स्वातंत्र्यवीर सावरकर.
 भारत देशाप्रती असलेल्या प्रेमाचे.. निष्ठेचे... त्यागाचे दुसरे नाव म्हणजे सावरकर.स्वा. सावरकर सामान्य कुटुंबातले. बालपणीच आईने जगाचा निरोप घेतला. येसूवहिनीने त्यांचा  सांभाळ केला. त्यांनी भारतमाता हीच खरी आई मानली अन् परदास्याच्या शृंखलातून मातेच्या सुटकेसाठी अंदमानात कारावास भोगला. जगविख्यात ठरलेली मार्सेलीसच्या समुद्रात उडी घेणारे पराक्रमी सावरकरच. स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाने बलाढ्य ब्रिटिश सत्तेला धडकी भरायची. तिन्ही सावरकर बंधू आणि त्यांच्या घराण्याने भारतमातेसाठी सर्वस्व त्याग केला. अत्याचार सहन केले आणि तरीही अपूर्व त्यागानंतरही कोणत्याही प्राकारचे श्रेय माञ घेतले नाही.
 
        स्वातंत्र्यासाठी देशासमोर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला. त्यांनी  शिवप्रभूंची आरती लिहीली. तानाजी मालुसरे यांच्यावरील पोवाडा असो वा १८५७ चे स्वातंत्र्य समर हे सारे लोकांमध्ये देशप्रेम वाढविणारे.. जनजागृती करणारे काव्य. अंदमानच्या कोठडीत कोळशाने महाकाव्य लिहणारा वि. दा. सावरकरांसारखा महाकवी पुन्हा होणे नाही. भारत माते विषयी अपार श्रद्धा, निष्ठा त्यांच्या "जयोस्तुते" या स्वलिखित गीतामधून स्पष्ट होते.


  जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
  स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे

  राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
  स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
  परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
  स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
  वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

  गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
  स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली
  तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
  स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
   वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

  मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
  स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती
  जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
  स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
  वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

  हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
  तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
  तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते
   वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

  गीत : स्वातंत्र्यवीर सावरकर


                
             
                                 (सौ. गुगल इमेजेस)


पुस्तक--  माझी जन्मठेप

लेखक--वि. दा. सावरकर 

प्रकाशन-- परचुरे प्रकाशन 


लेखक परिचय:

    *  सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. 

    *   सावरकर धर्माने हिंदू होते.त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच चाफेकर बंधू यांचा प्रभाव होता. घरातील वातावरणही पोषक असल्यामुळे त्यांचा ओढा स्वातंत्र्यचळवळी कडे झुकत चालला होता. 

      *  सावरकरांनी अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली.देशासाठी कार्य करण्याच्या त्यांच्या निस्वार्थ वृत्तीमुळे तरुणांमध्ये ते लोकप्रिय बनत गेले. एवढेच नाही कितीतरी क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान बनले.

      *   सावरकरांनी जवळजवळ ४१ पुस्तके लिहिली आहेत. आपल्या लेखणीतून त्यांनी देश प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. धगधगते लेखक ,समाज क्रांतिकारक, समाज सुधारक अशी कितीतरी नावे त्यांना देता येतील. 

       *  थोर समाजसुधारक, क्रांतिकारक वि .दा. सावरकर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी अनंतात विलीन झाले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली स्वलिखित पुस्तके--

वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.


स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ४१ पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे, त्यातील पुस्तके अशी :


१) अखंड सावधान असावे

२) १८५७ चे स्वातंत्र्यसमर

३) अंदमानच्या अंधेरीतून

४) अंधश्रद्धा भाग १

५) अंधश्रद्धा भाग २

६) संगीत उत्तरक्रिया

७) संगीत उ:शाप

८) ऐतिहासिक निवेदने

९) काळे पाणी

१०) क्रांतिघोष

११) गरमा गरम चिवडा

१२) गांधी आणि गोंधळ

१३) जात्युच्छेदक निबंध

१४) जोसेफ मॅझिनी

१५) तेजस्वी तारे

१६) नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन

१७) प्राचीन अर्वाचीन महिला

१८) भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने

१९) भाषा शुद्धी

२०) महाकाव्य कमला

२१) महाकाव्य गोमांतक

२२) माझी जन्मठेप

२३) माझ्या आठवणी - नाशिक

२४) माझ्या आठवणी - पूर्वपीठिका

२५) माझ्या आठवणी - भगूर

२६) मोपल्यांचे बंड

२७) रणशिंग

२८) लंडनची बातमीपत्रे

२९) विविध भाषणे

३०) विविध लेख

३१) विज्ञाननिष्ठ निबंध

३२) शत्रूच्या शिबिरात

३३) संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष

३४) सावरकरांची पत्रे

३५) सावरकरांच्या कविता

३६) स्फुट लेख

३७) हिंदुत्व

३८) हिंदुत्वाचे पंचप्राण

३९) हिंदुपदपादशाही

४०) हिंदुराष्ट्र दर्शन

४१) क्ष - किरणें


माझी जन्मठेप:


        वि. दा. सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले  माझी जन्मठेप हे पुस्तक. देशासाठी सावरकरानी भोगलेले कष्ट व यातना यांची परतफेड देश कधीही करू शकणार नाही. त्यांनी सोसलेल्या यातना वाचून अंगावर शहारे येतात. देशाप्रती असणाऱ्या अतिव देशभक्ती मुळेच त्यांना या यातना सहन झाल्या असाव्यात.

                       "ने मजसी ने परत मातृभूमीला

                            सागरा प्राण तळमळला.."

ही कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या च लेखणीतून अजरामर झाली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या भारतातील युवा पिढी च्या मनात आजही या कविताने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

          देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत असताना देशद्रोहाचा खटला त्यांच्यावर लादण्यात आला व त्यांना दोन जन्मठेपेची  काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली. ही शिक्षा सुमारे पन्नास वर्षे एवढी होती. भारतीय नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व स्वतःला सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिशांची बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.

       अंदमानात त्यांना झालेली कोठडी आणि त्या तुरुंगात त्यांचे झालेले हाल याचे करून वर्णन या पुस्तकात केले आहे.  रत्नागिरीच्या तुरुंगात असताना  भोगाव्या लगणाऱ्या यातना सावरकरांनी चित्र रूपात कोरले. त्याच शिलालेखाचे विस्तृत वृत्तांत म्हणजे माझी जन्मठेप.स्वानुभावाने भोगलेला त्रास त्यांनी आपल्या भावाला सांगितला.

        तुरुंगात त्यांना मिळालेली वागणूक वाचताना अंगावर काटा येतो.जन्मठेपेची शिक्षा भोगून सावरकर अंदमानातून मुंबईला येण्यासाठी " महाराजा " जहाजावर चढले तो दिवस म्हणजे 2 मे १९२१ होता.

                     तुरुंगातील हाल सोसताना अन्याय सहन झाला नाही आणि प्रतिकार केला तर त्याचा उलट परिणाम होत असे. अधिक छळ, अधिक मार, अधिक हाल, जेवण मिळणार नाही, मग् अशा वेळी करणार तरी काय? निमूटपणे सहन केल्याशिवाय सवरकरांकडे च काय पण इतर कैद्यानजवळ ही दुसरा पर्याय नव्हता. हा त्रास सहन झाला नाही की, आत्महत्या ही ठरलेली असे..

                       अंदमानातील शेवटच्या दिवसात जेव्हा त्यांचे बंधू त्यांना भेटायला आले तेव्हा त्याना वाटू लागले की

ही भेट शेवटची....आपल्या भावाला आपण यानंतर पाहू की नाही असे त्यांना वाटू लागले..

                      सावरकर लिहितात-"१९११ व्या वर्षी बंद झालेले ते त्या कारागृहाचे दार १९२१ व्या वर्षी परत एकदा करकरले. त्या जबड्याचे ते तोंड परत एकदा उघडले आणि आम्ही दोघेही बंधू जिवंतपणे आतून बाहेर पडलो."

                      सावरकर व त्यांच्या बंधुस निरोप देण्यासाठी सर्व कैदी आतुर झाले होते. यातील एकाने कोणासही न जुमानता, परिणामांची तमा न बाळगता चाफ्याच्या फुलांची माळ सावरकर यांना घातली आणि पायावर डोके ठेऊन निघून गेला. स्वातंत्र्यसाठी प्राणाची आहुती देणारी अशी माणसे पाहिली की मनात स्वातंत्र्यज्योत पेटल्याशिवाय राहत नाही.

                         बारा वर्षनंतर सावरकरांनी लांबवर पसरलेल्या अफाट समुद्रावर भारत भूमी चा किनारा प्रथम पहिला त्यावेळी त्यांच्या तोंडून फुटलेले शब्द व त्यांची अवस्था याचे उत्कट वर्णन त्यांनी आपल्या शब्दात मांडले.ते म्हणतात-  

"बाबा! ते पहा भारत! ते पहा त्याचे निलसिंधुजलधौत         चरणकमल!"

                         मृत्यूशी झुंज देऊन सावरकर सुखरूप मायदेशी परतले. अंदमानातील त्यांनी भोगलेले पर्व हे अत्यंत रौद्र आणि भयावह आहे.याचे रोमांचक वर्णन त्यांनी माझी जन्मठेप या त्यांच्या पुस्तकात केले आहे. 

भारत मातेच्या स्वातंत्र्याचा ध्यास उराशी बाळगून देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीराची रोमांच कथा वाचून देशाप्रती आणि सावरकरां च्या प्रति अभिमान  जागृत झाले नाही तरच नवल! त्यांच्या त्यागाला त्रिवार वंदन...

     ©® मैथिली कुलकर्णी, नांदेड 

*नक्की वाचा*

सारे काही शांततेसाठी- सुहासिनी पांडे

जिजाऊसाहेब [मदन पाटील]|ऐतिहासिक कादंबरी


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges