Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
( सौजन्य - गुगल इमेज )
जिजाऊसाहेब
मदन पाटील
स्वराज्यासाठी, मराठी मातीसाठी, तिच्या अस्मितेसाठी आणि त्यास स्वतंत्र असे अस्तित्व मिळवून देण्यासाठी दिवसा ढवळ्या पाहिलेले स्वप्न छत्रपती शिवरयांकरवे मूर्त रूपात आणणाऱ्या ...स्वराज्य जननी ..जिजाऊ साहेब!!
श्री स्वामी पब्लिकेशन, पुणे प्रकाशित मदन पाटील यांनी लिहिलेले "जिजाऊ साहेब" हे पुस्तक. जिजाऊंच्या जीवनावर ही कादंबरी रचली गेली आहे. ही कादंबरी वाचत असताना जिजाऊंची शिकवण आणि त्यांतून युद्ध पारंगत झालेल्या आपल्या पुत्र शिवबाच्या पराक्रमाची गाथा उकलत जाते.
जिजाऊंच्या कार्याची दखल आज सर्व जगात घेतली जात असली तरीही त्या काळची परिस्थिती मात्र फार वेगळी होती. गुलामगिरी, पारतंत्र्य मराठी मातीतील लोकांच्या अंगवळणी पडले होते. अन्याय, अत्याचार सहन करत जनता जीवन जगत होती. राजमाता जिजाऊंना मात्र हे अमान्य होते. त्यांच्या मनातील हे शल्य, हा धगधगता निखारा ज्वाला बनून शिवरायांच्या रूपात जन्माला आला आणि जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न शिवरायांनी जिजाऊंच्या कुशल नेतृत्वाने पूर्ण केले. हे कार्य काही सोपे नव्हते... प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली, जनतेत स्वाभिमान जागृत करावा लागला. त्या काळातील एका महिलेने केलेले हे महान कार्य वाचताना जिजाऊसाहेबांबद्दल चा आदर अधिकच द्विगुणित होतो.
मराठी साम्राज्य उदयास येण्यासठी कारणीभूत ठरलेल्या जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांकडून हे महान कार्य करवुन घेतले...जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्यास आकार दिला.जिजाऊ लहान असताना च त्यांना गुलामगिरी खटकत असे, त्या क्रोधाने तडफडत असत. दुसऱ्यांची चाकरी करण्यापेक्षा मरण बरे असे त्यांना नेहमी वाटत असे. त्यांच्या या विचारांचे पडसाद त्यांच्या बालमनावर कोरत गेले. शिवबांवर ही नकळत हे गर्भसंस्कार होत गेले. त्यामुळेच शिवाजी आपले स्वप्न पूर्ण करू शकेल याची खात्री त्यांना वाटू लागली. मग त्यासाठी त्यांनी हालचाल सुरू केली. शिवबास तसे युद्ध नीतीचे शिक्षण दिले.शिवाजी महाराजांनी ही जिजाऊंच्या कार्यात स्वतःला झोकून दिले आणि अथक कष्टातून उभे राहिले ते मराठयांचे हिंदवी स्वराज्य!
मदन पाटील यांच्या या कादंबरीतून जिजाऊ साहेबांच्या बालपणाचा तसेच त्यांच्या आप्तेष्टांचा इतिहास समजतो. त्यांचे घराणे हे भगवान श्रीकृष्णाच्या घराण्याचे वांशज होते हे या कादंबरीत नमूद करण्यात आले आहे. जिजाऊसाहेब या निजामशाहीचे मातब्बर सरदार "लखुजी राजे जाधव " यांच्या कन्या. त्यांच्या आईचे नाव म्हाळसा राणी. जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा ( जिल्हा- बुलढाणा ) येथे झाला. मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. निजामशाहीचा हुकमी कारभार त्या स्वतःच्या डोळ्यांनी लहानपणापासून पाहत आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मनात निजामाने केलेल्या अन्यायाप्रती भयंकर चीड होती. हा न्याय आपण का म्हणून सहन करायचा?? असेच त्यांना नेहमी वाटत असे.
कादंबरी वाचताना जिजाऊंच्या अनेक गणगोताची ओळख होत जाते. जसे....
जगदेवराव जाधव हे जिजाऊंचे काका होते.
जगदेव ,दत्ताजी, अचलोजी, बहादुर हे जिजाऊंचे भाऊ होते.
उमाऊसाहेब,राजाराम देव ,हेमाद्री पंडित, गोमाजी पानसंबळ, संभाजी राजे भोसले, तू काऊ मोहिते, कान्होजी जेधे, बाजी पासलकर, बाजी घोरपडे, अशा अनेक ऐतिहासिक मातब्बर सरदारांची पुस्तकात नोंद आहे. वाचताना त्यांच्या कार्याचा अंदाज बांधता येतो. हजारो-लाखो सरदार आणि मावळ्यांच्या रक्तातून मराठी स्वराज्याची स्थापना झाली.
आजच्या महिलांना एवढंच सांगावस वाटत की, घ्यायचाच असेल तर जिजाऊंच्या स्वभावातील कर्तबगारी, कुशल प्रशासन,कर्तव्य कठोरता, हे त्यांचे गुण आत्मसात करून कार्य करूया... आणि आम्ही जिजाऊंच्या लेकी हे अभिमानाने म्हणू या.
आपण केलेले कोणत्याही क्षेत्रातील प्रामाणिक कार्य हीच त्यांनी केलेल्या त्यागाची खरी पोच पावती ठरेल.
एकदा नक्की वाचा---जिजाऊसाहेब!
©®मैथिली कुलकर्णी, नांदेड
टिप्पण्या