Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
गुंजाली (कथा संग्रह)
लेखिका:-
अश्विनी निवर्गी
रोहिणी पांडे
अपर्णा कुलकर्णी
अर्चना संबरकर
मैथिली कुलकर्णी
प्रकाशन:- गणगोत प्रकाशन
किंमत:- ₹२००/-
गुंजाली:-
" गुंजाली " नाव थोडंसं वेगळं आणि सुंदर वाटलं म्हणून हे पुस्तक वाचण्यास घेतलं. ९६ पाने असणाऱ्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ उघडताच "तिच्यातल्या "ती"ला समर्पित" ही ओळ वाचण्यात आल्याने उत्सुकता अधिकच वाढली. मा. डॉ. शंकर विभुते सरांची प्रस्तावना आणि पांडुरंग पुठ्ठेवाड यांच्या गणगोत प्रकाशनाचा हा कथासंग्रह. मराठवाड्यातील पाच सख्यांनी एकत्र येऊन त्यांनी आपल्या अनुभूतीची आखीव, रेखीव मांडणी कथेच्या रूपात गुंजाली या कथासंग्रहात केली आहे. प्रत्येक सखीच्या तीन अशा एकूण पंधरा कथांचा यात समावेश आहे. उदगीर येथील सौ अश्विनी निवर्गी यांच्या "माऊली", "श्रद्धांजली" आणि "अनुत्तरीत प्रश्न" या तीन कथांचा यात समावेश आहे. नांदेड येथील रोहिणी पांडे यांनी"कावेरी आणि नर्मदा","डी. पी." आणि "मानवी बॉम्ब" या तीन कथा लिहिल्या आहेत."स्वदेश","चिरतारुण्य" आणि "दान मातृत्वाचे" या कथा नांदेड येथील मैथिली कुलकर्णी यांच्या लेखणीतून कथा रुपात उतरल्या आहेत. परभणी येथील अर्चना संबरकर लिखित "अट्टाहास","परतावा" आणि "अबोल प्रीत" या कथांमधून भावभावना व्यक्त झाल्या आहेत. तर "विजया" ,"मनाचा कॅन्सर" आणि "पॅटर्न" या कथा अंबेजोगाई येथील अपर्णा कुलकर्णी यांनी लिहिल्या आहेत.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या आणि फारशी समज नसणाऱ्या विद्यार्थ्याची कथा "माऊली" मध्ये मांडण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागातील पाण्याच्या प्रश्नाकडे " कावेरी आणि नर्मदा" ही कथा लक्ष वेधून घेते. भारतीय नागरिकांच्या मनात नव्हे रक्तात असणारे देशप्रेम व्यक्त करणारी कथा म्हणजेच "स्वदेश". कामाची वाटणी दर्शवणारी "अट्टाहास" ही कथा."मनाचा कॅन्सर" ही देखील आकर्षक कथा आहे. पाच वेगवेगळ्या लेखिकेच्या पहिल्या पाच कथांचे कथाबीज ही वेगवेळे आहे. प्रत्येक कथेचा आशय, विषय वेगवेगळा आहे.
घटस्फोट ,आत्महत्या यासारख्या समाजातील ज्वलंत विषयावर मोलाचा सल्ला "विजया" या कथेतून देण्याचा प्रांजळ प्रयत्न झाला आहे. मोबाईलच्या आहारी जाणारी आणि मोबाईल हेच सत्य समजणारी आजची पिढी आणि त्यांचे प्रेम या पवित्र भावनेने जोडणारे वरवरचे रेशीम बंध याबद्दल "डी.पी" या कथेतून भावना मांडल्या गेल्या आहेत."श्रद्धांजली" ही कथा विनोदाकडे झुकलेली आहे. विनोद बुद्धीचा वापर करून गंभीर विषयाचे लेखन या कथेत करण्यात आले आहे. सावत्रपणाची भावना निर्माण झाली की नात्यांमध्ये चढ-उतार येतात. नकळत नात्यात भेदभाव होऊ लागते आणि त्यास जिम्मेदार कोण? तर पालक.. याची जाणीव होऊन मुलगा मुलगी भेद बाजूला सारून प्रायश्चित्त म्हणून मुलींना प्रेमाचा परतावा दिला जातो अतिशय सुंदर मांडणी येथे केली आहे.समाजातील जात ,धर्म श्रीमंत-गरीब सर्व भेद बाजूला सारून जपलेले मैत्री प्रेम "चिरतारुण्य" या कथेतून व्यक्त झाले आहे. समाजातील अतिशय गंभीर अशा दहशतवादाच्या बळी ठरलेल्या मुलींची कथा" मानवी बॉम्ब" या कथेत मांडली गेली आहे. घरातील आपल्याच माणसाला मातृत्वाचे दान देऊन कौटुंबिक नातेसंबंध स्थिर ठेवणाऱ्या दानशूर वृत्तीची कथा दान मातृत्वाचे यात वाचायला मिळते. आजच्या शिक्षण पद्धतीवर कटाक्ष टाकणारी" पॅटर्न" ही कथा आहे. सद्यस्थितीत समाजाची शिक्षणा प्रतीची वैचारिक पातळी कशी आहे? याचा विचार करण्यास ही कथा भाग पाडते. प्रेम विवाहातून उपस्थित होणारे प्रश्न "अनुत्तरित प्रश्न" या कथेत मांडले आहेत. तर प्रेम या भावनेने मनःपटलावर उमटलेले विविध तरंग "अबोल प्रीत" या कथेतून वाचायला मिळतात.
वाचक या सर्व कथा वाचता वाचता शेवटाकडे येतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती अशी की, या कथांमधील पात्रं ही आपल्या सभोवताली वावरत असल्याचा भास वाचकास होतो. कथेतील पात्रांचे संवाद हे वाचकांच्या मनातील ओठातील असल्यासारखे भासतात. संवादाची भाषा कथेला अनुसरून घेतल्यामुळे कथांना योग्य न्याय मिळाला आहे. आणि त्यामुळेच की काय प्रत्येक कथा जणू स्वतःच्या जीवनातील अनुभव असल्यासारखे वाचकास वाटतात. सारांश सांगायचा झाल्यास, भाषा शैलीचा यथायोग्य वापर, वेगवेगळे समाजानुकूल विषय, कथेतून मिळणारा बोध, सकारात्मक दृष्टीने झालेली कथेची मांडणी आणि उत्कृष्ट संवाद या सर्व गोष्टींचा सुरेख मिलाफ " गुंजाली" मध्ये झाला आहे. त्यामुळे पुस्तक एका बैठकीत वाचून सहज पूर्ण होते. वाचक नवा विचार, नवी स्फूर्ती कथांमधून घेतो.
पाच लेखिका एकत्र येऊन समकालीन विचारांचा केलेला शब्द नाद म्हणजे गुंजाली हे पुस्तक वाचकांनी जरूर वाचावे. गुंजाली च्या पाचही लेखिकांचा हा प्रयोग चरा चरात यश संपादन करणारा ठरावा हीच मनोकामना!! पुढील साहित्य वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!
परीक्षण:- सुरेखा कुलकर्णी, उदगीर
नटसम्राट (वी. वा. शिरवाडकर)|Natsamrat-Kusumagraj
टिप्पण्या