Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
जीवन ही एक रंगभूमी आहे आणि आपण त्या रंगभूमीवर काम करणारे नाटककार. या रंगभूमीवर येणे आणि जाणे हे दोन्ही आपल्या हातात नसते. ही जबाबदारी पार पाडणारा परमेश्वरच. जन्म आणि मृत्यू या दोन्हीतील अंतर म्हणजेच जीवन. ते कसे जगायचे हे प्रत्येकाच्या जीवनशैली वर, आयुष्यात त्या जीवावर घडलेल्या संस्कारावर अवलंबून असते. असाच एक जीव मराठी मातीत जन्मला ज्याने मराठी साहित्याला आपल्या लेखणीने समृद्ध केले आहे. मराठी भाषेसाठी चे त्यांचे योगदान हे अनमोल आहे. अनेक पारितोषिकांचे मानकरी असणारे हे महान व्यक्ती कोण ?? ते आहेत... वि.वा. शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर हे त्यांचे संपूर्ण नाव. कुसुमाग्रज या टोपण नावाने त्यांनी आपले लेखन केले आहे.
पुस्तकाचे नाव: नटसम्राट (नाटक)
लेखक: वि. वा.शिरवाडकर
प्रकाशन: पॉप्युलर प्रकाशन
* वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. लहान असतांनाच त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव बदलून विष्णु वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. कुसुमाग्रज यांचे वडील वकील होते. त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती. कुसुम ही घरातील सर्वांची लाडकी होती. एकुलती एक बहिण कुसुम असल्याने त्यांनी कुसुम चे अग्रज अर्थात कुसुमाग्रज नाव धारण केले. तेव्हापासूनच शिरवाडकर हे " कुसुमाग्रज " या टोपणनावाने लेखन करू लागले.
* १९८७ साली कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
* मराठी भाषेतील कुसुमाग्रज यांच्या योगदानाची दखल घेत २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस
" मराठी राजभाषा दिन " म्हणून साजरा केला जातो.
* वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी १० मार्च १९९९ रोजी आपल्या राहत्या घरात देहत्याग केला. त्यांचे निधन झाले त्यावेळी ते ८७ वर्षाचे होते.
नटसम्राट हे वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेले नाटक आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवलेल्या या प्रसिद्ध नाटकाने इतिहास रचला. विल्यम शेक्सपियर यांच्या अनेक कलाकृतींवर हे आधारलेले आहे. या नाटकावर त्याचा प्रभाव असला तरीही हे भाषांतर नसून संपूर्णतः वेगळे आहे. कुसुमाग्रजांच्या लेखणीतून साकारलेले नटसम्राट हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमी साठी त्यांनी दिलेले अनमोल रत्न आहे. रंगभूमीवर या नाटकाचा पहिला प्रयोग १९७० रोजी झाला. गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलगावकर यांची भूमिका पहिल्यांदा डॉ. श्रीराम लागू यांनी साकारली . हे एक शिवधनुष्य होते आणि हे शिवधनुष्य पेलण्याचे भाग्य डॉक्टर श्रीराम लागू यांना मिळाले. त्यांच्यानंतर अनेक कलाकारांनी हे पात्र रंगभूमीवर साकारले आहे.
आपले उभे आयुष्य रंगभूमीसाठी वाहणाऱ्या आणि अथक परिश्रम करून कष्टाने लोकप्रियतेचे उंच शिखर गाठणाऱ्या एका नाटककाराची त्याच्या आयुष्याच्या शेवटी कशी फरफट होते याचे वर्णन म्हणजे हे नाटक आहे. स्वतःच्याच मुलांना आपले आई-वडील जेव्हा नकोसे होतात तेव्हा आई-वडिलांच्या मनावर काय यातना होत असतील? याचेच हृदयद्रावक वर्णन यात करण्यात आले आहे.
गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर, त्यांची पत्नी कावेरी ( जिला ते सरकार असे म्हणत ) आणि त्यांची दोन मुले (एक मुलगा आणि एक मुलगी ) असा त्यांचा सुखी संसार असतो. कावेरी मुलांचे छान संगोपन करते. मुले मोठे होतात, त्यांची लग्नही होतात. आप्पा साहेबांना वाटते की , आपण आता निवृत्त व्हावे. ते आपल्या संपत्तीची वाटणी करून आपण मुलांजवळ निवांत राहावे असा विचार करतात. सर्व काही मुलांचेच आहे , आपल्या नंतर ते त्यांनाच मिळणार आहे असे त्यांना वाटते. त्यावेळी त्यांचा हा विचार त्यांच्या सरकारला पटत नाही. आपल्यासाठी आपण काहीतरी ठेवावे असे त्यांना वाटते. सर्व काही मुलांना देऊन आपण निराधार व्हावे ही संकल्पना त्यांना मान्य नसते. तरीही त्या आप्पा साहेबांच्या विरोधात जात नाहीत.
आपल्या मुलीकडे, आपल्या लाडक्या कोकराकडे राहण्यासाठी ते जातात. स्वतःची मुलगी त्यांना राहण्यासाठी गेस्ट हाऊस देते हे त्यांना पटत नाही. पण तरीही हा अपमान ते सहन करतात. केवळ आपल्या कोकरासाठी... आणि त्यांचे हेच कोकरु जेव्हा त्यांच्यावर चोरीचा आळ घालते तेव्हा त्यांना हे सहन होत नाही. हा आघात ते सहन करू शकत नाहीत. त्यांना असह्य वेदना होतात आणि ते आपल्या कोकराचं घर सोडून स्वतःच्या गावी म्हणजे मोरवाडी ला जाऊन राहण्याचा निर्णय घेतात.
नटसम्राट यांची पत्नी म्हणजे सरकार त्यांना म्हणतात... आपण परत मोरवाडी ला जाऊ. तेथे आपण एक तुळशीचे वृंदावन बांधू. माझे हात थकले असले तरी मन अजून खंबीर आहे. तुमची साथ असेल तर कसल्याही वादळ वाऱ्याची तमा आपण बाळगायची नाही. आपल्या पतीला धीर देणारी त्यांची पत्नी.... नटसम्राट यांचे सरकार. स्वतःच्या वेदना माञ सहन करू शकत नाही. असह्य वेदनेने विव्हळलेले एका आईचे हृदय थांबते आणि नटसम्राट यांची सरकार त्यांना सोडून जाते. नटसम्राट यांच्यावर चा हा दुसरा आघात . कावेरीच्या निधनाने ते अत्यंत दुःखी होतात आणि मनाने खचतात. नटसम्राट यांना प्रश्न पडतो-
कशासाठी जगतो आहोत आम्ही?? *To be.....or not to be...*
जगावं की मरावं.... हा एकच प्रश्न त्यांना भेडसावत राहतो...
नटसम्राट या नाटकातील संवाद हे अतिशय संवेदनशील आहेत ते थेट काळजाला जाऊन भिडतात. वाचताना अश्रू अनावर झाले नाहीत तरच नवल... आप्पासाहेब आपल्या मुलीचे घर सोडून जातात तेव्हाचा संवाद तर अतिशय हृदयद्रावक आहे...
कुणी घर देता का घर?
एका तुफानाला कुणी घर देत का?
एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगला-जंगलात हिंडत आहे.
जिथून कोणीही उठवणार नाही अशी जागा धूंडतय
कुणी घर देत का घर?
स्टेशनवर एका बूटपॉलिश करणाऱ्या मुलाजवळ ते थांबतात. तेव्हा त्यांच्या मुलांना ही बातमी समजते व ते नटसम्राट यांना घेण्यासाठी येतात तेव्हा ते म्हणतात....
तुमचा बाप तेव्हाच मेला ....मला कोणीही नाही. कोणीही नाही. मी एकटा आहे. मला कोणीही नाही.... आणि असह्य वेदनेने ते खाली कोसळतात.
माणसाचे तन आणि मन हादरवून टाकणारे अतिशय उत्कट वर्णन असणारे हे नाटक माणसाच्या आयुष्यातील अनेक रूपाचा उलगडा करत जाताना दिसून येते. काळानुरूप माणसाच्या वर्तनात कसा बदल होत जातो... कोणीही कोणाचे नसते हा जीवनाचा सार आहे... पुस्तक वाचताना याचा प्रत्यय येतो. प्रत्येकाने एकदा तरी हे नक्की वाचावे आणि त्यातून बोध घ्यावा असे हे नटसम्राट नाटक आहे. तेव्हा एकदा तरी नक्की वाचा--- नटसम्राट.
©® मैथिली कुलकर्णी
Wachan katta with Maithili Kulkarni
टिप्पण्या