प्रस्तावना:-
आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या लातूर जिल्ह्यातील कार्यकारणीतील दहा पदाधिका-यांनी एकत्र येऊन त्यांच्या लेखणीतून साकारलेला कथासंग्रह म्हणजे आम्ही नवदुर्गा. 2021 मध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला कै. मोहन कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून या संस्थेचे बीज रोवले गेले. कोरोना या महामारी मुळे संपूर्ण जगच त्रस्त असताना, संपूर्ण कुटुंब घरात असताना अशा वेळी घरातील प्रत्येक माणसाच्या तब्येतीची काळजी घेण्यासोबतच स्वतःची तब्येत आणि स्वतःची मानसिकता ढळू न देणे हा मोठा टास्क एक गृहीणी ,एक महिला म्हणून प्रत्येक स्त्री वर होता. अशा अस्वस्थ मानसिकतेतून स्वतःला सावरत, कुटुंबाला फुलाप्रमाणे जपत असतानाच स्त्रियांनी स्वतःमधील साहित्यलेखन डिजिटल माध्यमातून जगासमोर आणण्यासाठी पुढाकार घेतला. याचेच एक फलित म्हणून आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेकडे पाहता येईल. दोन वर्षाच्या या काळात संस्थेच्या अध्यक्ष माननीय प्राध्यापिका पद्माताई हुशिंग,उपाध्यक्ष माननीय प्राध्यापिका विजयाताई मारोतकर यांच्या खंबीर नेतृत्वामुळे या संस्थेचा व्हाट्सअप वर समूह तयार झाला. प्रत्येक जिल्ह्यात त्याच्या शाखा स्थापन झाल्या. विविध कार्यक्रम ,सुंदर लेखन , उत्तम मार्गदर्शन, ज्येष्ठ सल्लागार समिती, कर्तव्यदक्ष कार्यकारिणी यांच्या योगदानामुळेच आज या संस्थेचे गोंडस रुपडे झाले आहे. आणि त्याच्या फांद्या आता आकार घेऊ लागल्या आहेत. नुकताच या संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. वर्षभराच्या या साहित्य कार्याचा आढावा घेता आज जवळजवळ छत्तीस जिल्ह्यात ही संस्था कार्यरत तर आहेच त्याचबरोबर संपूर्ण भारत आणि भारताबाहेरील मराठी महिला या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत.
पुस्तकं:- आम्ही नवदुर्गा (कथासंग्रह)
प्रकाशन:- पाणिनी प्रकाशन
किंमत:- ₹२००/-
आम्ही नवदुर्गा:-
अखंड अविरत साहित्य कार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या या सख्यांपैकी लातूर शाखेतील दहा सख्या एकत्र येतात आणि आपला अनुभव कथा रूपात मांडतात व त्याचे सुंदर रूप आम्ही नवदुर्गा या कथासंग्रहाच्या पुस्तकरूपात वाचकांच्या समोर येते ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. स्वतःचे घर, व्यवसाय, नोकरी सांभाळून स्वतः मधील साहित्यिक जागृत ठेवण्यासाठी उचललेले हे पाऊल म्हणजे कौतुकाचा विषय म्हणता येईल. संगीता चव्हाण व श्वेता चव्हाण यांच्या पाणिनि प्रकाशनाने नटलेले आणि आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या अध्यक्ष माननीय प्राध्यापक सौ पद्मा हुशिंग यांच्या शुभेच्छा लाभलेला हा कथा संग्रह खूपच सुंदर आणि दर्जेदार झाला आहे.
माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान नागपूरच्या अध्यक्ष आणि आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या उपाध्यक्षा माननीय प्राध्यापिका विजयाताई मारोतकर या कथासंग्रह बद्दल आपले मत मांडताना म्हणतात.....
"स्त्री अस्तित्वाच्या जाणिवांचा जागर असलेला कथासंग्रह "आम्ही नवदुर्गा".
आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या लातूर शाखेच्या कार्यकारिणीतील सौ. अश्विनी निवर्गी, सौ अर्चना नळगीरकर, सुनंदा सरदार, प्रा. सौ.अश्विनी देशमुख, सौ छाया दीक्षित,निता मोरे, मंजुषा कुलकर्णी , सौ.अनिता संकाये,सुरेखा गुजलवार, सौ प्रीती दुरुगकर अशा दहा सख्यांच्या प्रत्येकी दोन कथांचा या कथासंग्रहात समावेश आहे. संगीत शिल्प क्रिएशन ने अतिशय सुंदर मुखपृष्ठ बनवून या पुस्तकाला सुशोभित केलेले आहे.
"प्रार्थना" या कथेने सुरुवात होत असताना अश्विनी निवर्गी यांच्या या कथेतून त्यांनी स्त्रियांच्या नाजूक विषयावर स्पष्टपणे लेखन केले आहे. मासिक पाळी सारखा नाजूक विषय स्त्रिया गांभीर्याने न घेता केवळ धार्मिक सण उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून बिनदिक्कत गोळ्या औषधे घेऊन नैसर्गिकरीत्या येणाऱ्या मासिक पाळी ला मागेपुढे करतात. स्वतःच्या शरीराची पर्वा न करता केलेल्या कर्मामुळे त्यांना पुढे त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. हा अतिशय महत्त्वाचा विषय हाताळला गेला आहे. यावर कुठेतरी आळा बसलाच पाहिजे ज्यामुळे मुख्यत्वे स्त्रियांमध्ये होणाऱ्या गंभीर अशा कॅन्सर सारख्या रोगांवर आळा बसेल. सलोनी ही कथा नायिका हाच मुद्दा मांडताना स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसून येते.
"पानगळ" ही सौ. अर्चना गोपाळकृष्ण नळगीरकर यांची कथा वाचताना आजची बदलत चाललेली समाजातील कुटुंबव्यवस्था अस्वस्थ करून जाते. मात्र आजी आणि नात यांच्या नात्याची जुळलेली नाळ मनाला ओलावा देते. त्यामुळेच की काय गृह उपयोगी वस्तूचे भांडार उघडणाऱ्या स्वातीचा मनातून अभिमान वाटतो.
सुनंदा अशोक सरदार यांची "धाडसी पारू" ही अशीच एक मनाला स्पर्शून जाणारी कथा. दारूच्या व्यसनापायी उद्ध्वस्त होणा-या संसाराला गावात राहूनही स्वताची अब्रू वाचवणारे व स्वतः सोबतच इतर स्त्रियांसाठी आदर्श ठरणारी धाडसी पारू या कथेतून समोर आली आहे. कथेला अनुरूप भाषा शैलीचा यथायोग्य वापर ही या कथेची जमेची बाजू म्हणता येईल.
" ती पुन्हा भेटली नव्याने...." प्रा. सौ अश्विनी संजय देशमुख लिखित अप्रतिम कथा. ऋणानुबंधाच्या गाठी या परमेश्वराने बांधलेल्या असतात याची साक्ष ही कथा देऊन जाते. ज्या परमेश्वरी कलाकृतीने स्त्रीरूपात येऊन कथानायकाला मोहिनी घातली आणि अदृष्य झाली तीच आपली नववधु
म्हणून समोर पाहताना कथानकाला वाटणारा भाव कथेत सुंदर रेखाटला गेला आहे.
"कावळा शिवला "ही सौ. छाया दीक्षित लिखित एक विलक्षण कथा. मुलींना वयात येणे म्हणजे काय हे समजण्यासाठी कावळा शिवला हा शब्द वापरला जायचा आजही बऱ्याच ठिकाणी या शब्दाचा प्रयोग केला जातो. मुलींमध्ये वयानुरूप होणारे शारीरिक बदल व त्यासाठी घ्यावयाची काळजी या विषयाकडे लक्ष वेधणारी ही सुंदर कथा नक्कीच बोध घेण्यासारखे आहे.
सौ नीता मोहनराव मोरे लिखित "निर्धार" ही कथा. शालेय शिक्षण घेत असलेला एखादा विद्यार्थी कोणत्याही तुकडीत शिकत असला तरीही त्याने मनाचा निर्धार केला तर तो आपल्या बुद्धीच्या जोरावर निश्चित यश संपादन करू शकतो याचा बोध या कथेतून घेतला गेला आहे.
बाल विवाह झालेल्या सोनुला आपल्या संसाराचा हातगाडा चालवताना होणारा त्रास आणि त्यामुळे एकमेकांपासून दूर राहून अबोल राहूनही पती-पत्नीचे नाते जपणारी, भारतीय संस्कृती जपणारी स्त्री "धाडसी सोनू"
मंजुषा कुलकर्णी लिखित कथेतून वाचकांसमोर आली आहे. एक मध्यमवर्गीय स्त्री संसार करताना काटकसर करत आपला गुजारा करते , आपल्या मुलाचे शिक्षण लग्न करते. हे सर्व करत असताना तिच्या शरीराची भयंकर झीज होते दुर्दैवाने तिच्याकडे पाहण्यास कोणालाही वेळ नसतो ही अवहेलना तिला असह्य होते एक दिवस ती आजारी पडते आणि हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत उशीर झालेला असतो.
वृद्धत्वाची मन हेलावून टाकणारी व्यथा सौ अनिता संकाये (टेंकाळे) यांनी "मुक्ती" या कथेतून मांडले आहे.
"फारकत" ही कथा सुरेखा गुजलवार यांनी लिहिले आहे. आपला संसार तुटू नये यासाठी कायम तडजोड करणारी मीनल जेव्हा असावे होते तेव्हा फारकती शिवाय तिच्याकडे पर्याय उरत नाही. स्त्रीच्या आयुष्यच मुळी तडजोड करण्यात व्यतीत होत असते. या कथेतून सत्यकथा मांडण्याचा प्रयत्न झाल्याचे जाणवते.
सौ प्रीती दुरुगकर यांनी रझाकाराच्या काळातील स्वाभिमानाने जगणारी "सुशीला"कथेतून मांडली आहे. त्या वेळची परिस्थिती आणि त्यावर मात करत आपला मार्ग प्रशस्त करणारी सक्षम स्त्री त्यांनी दर्शवली आहे.
आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी अपराधी आणि श्रीमंत असणाऱ्या असीम नावाच्या नराधमाचा खून करून आपल्या पत्नीला दिलेला शब्द पाळणारा कृष्णा सोहनी अश्विनी निवर्गी यांनी " सल " या कथेतून वाचकांसमोर आणला आहे. अतिशय हृदयद्रावक अंगावर शहारे आणणारी ही कथा आहे.
सौमित्र आणि राकेश अगदी जिवश्च कंठश्च मित्र. अभ्यासात कुशाग्र बुद्धीचे प्रत्येक क्षेत्रात प्राविण्य मिळवणारे ही जोडी त्यांच्या आयुष्यात असे काही वळण आले की राकेशला बालसुधारगृहात ठेवावे लागले काय कारण असावे हे? कोणते ते वळण ज्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलून गेले? वाचकांची आतुरता ताणून धरणारी सौ अर्चना गोपाळ कृष्ण नळगीरकर लिखित स्पर्धा ही कथा.
भामट्या प्रेमावर विश्वास ठेवून त्याचा बळी होणाऱ्या आणि प्रायश्चित्त म्हणून आपले अनमोल जीवन संपवू पाहणाऱ्या मुलींसाठी सुनंदा सरदार लिखित "भामटे प्रेम" ही कथा म्हणजे एक प्रेरणा म्हणता येईल. चांगले विचार आत्मसात करून सकारात्मक दृष्टीने जगाकडे पाहिले की आपले जीवन हे सुंदर होण्यास वेळ लागत नाही हा बोध ही कथा देऊन जाते.
25 वर्षीय कोवळा तरुण नीरज अचानक पोटात दुखण्याचे निमित्त होऊन दवाखान्यात ऍडमिट होतो आणि त्याचे शरीर हळूहळू निकामी होत जाते आणि शेवटी तो देह त्यागतो. त्याच्या जाण्यामुळे कुटुंबाची होणारी वाताहत आणि त्या कुटुंबास सावरण्यासाठी मदत करणारा मंगेश प्राध्यापिका सौ. अश्विनी संजय देशमुख यांनी" तुझसे नाराज नही जिंदगी...." या कथेतून वाचकांना दाखवले आहेत.
"माझे घर माझा संसार" या कथेतून सौ. छाया दीक्षित यांनी गर्भश्रीमंत डॉक्टर ची संपत्ती आणि डॉक्टर दांपत्याच्या सांभाळ करणारा सखाराम सुंदर रेखाटला आहे. सखाराम लहानपणीच आई वडिलांच्या प्रेमाला मुकलेला असतो. डॉक्टरांच्या रुपाने त्याला ते प्रेम मिळते आणि त्याचे आयुष्यच बदलून जाते.
अत्यंत गरीब परिस्थितीत असणारा दीपक शिक्षणासाठी वसतीगृहात त्याची रवानगी होते. त्या वातावरणात तो अगदी आनंदाने सहज सामावून जातो. आपल्या आई वडिलांच्या काबाड कष्टाची जाण ठेवून निश्चित ध्येय आणि रात्रंदिवस परिश्रम घेऊन अभ्यास करतो आणि त्याचेच फलित म्हणून तो उच्चपदस्थ अधिकारी बनतो. ज्या वस्तीगृहाने त्याला घडवलं, लहानाचं मोठं केलं, माया ,प्रेम दिलं त्याला मात्र तो विसरत नाही.लक्षात ठेवून त्याची उतराई करण्यासाठी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना भेटवस्तू घेऊन तो तिथे येतो .
"सपान" या कथेतून सौ.नीता मोरे यांनी अडचणीच्या वेळेत आपल्याला सहाय्य करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या लोकांना विसरता कामा नये हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
उच्च शिक्षणाचे निमित्त आणि शहराचा हव्यास यामुळे पाटलीन बाई यांचे कुटुंब शहराकडे वळते आणि मोठ्या दिमाखात गडीच्या वाड्यात राहणाऱ्या पाटलीण बाई चा "गढीचा वाडा" ढासळू लागतो. कालांतराने त्याची विक्री होते. मंजुषा कुलकर्णी यांनी
गढीचा वाडा या कथेतून शहरी वातावरणाकडे वळत जाणाऱ्या संस्कृतीचे चित्र रेखाटले आहे.
पतीविना जीवन जगणाऱ्या स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम दर्जा हा फार वेदनादायक असतो. समाजातील अनेक रूढी परंपरा बाजूला सारून एक माणूस म्हणून एक स्त्री म्हणून तिलाही सन्मान मिळायलाच हवा. हा सुंदर आणि सार्थ विचार आणि तसं काय टेंकाळे यांनी " हळदी कुंकू" या कथेतून मांडला आहे.
सौ. सुरेखा गुजलवार लिखित "मुक्ता" ही कथा आपला पती विवाहित आहे हे दुसऱ्या एखाद्या कडून जेव्हा आपल्याला कळते तेव्हा ती अवस्था असहनीय असते. विश्वास ठेवलेला साथीदार जेव्हा माणूस कृत्य करतो तेव्हा त्या स्त्रीने काय करावे? आयुष्य खूप सुंदर आहे. सकारात्मक दृष्टी ठेवली की त्यावर मार्ग निघतोच.मुक्ताने जो मार्ग निवडला तो यथायोग्य होता. तिने दुसरा विवाह केला आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली. एका पुरुषाला जर हे करता येत असेल तर स्त्रीला का करता येऊ नये?
"संस्कार" ही सौ. प्रीती दुरुगकर लिखित कथा.
आसिफ नावाच्या मुलाने घातलेल्या मायाजालात अडकून सुमनच्या आयुष्याचे वाटोळे होते. परत फिरण्याचा पर्याय तिच्याकडे असतो पण आईवडिलांकडे कोणत्या तोंडाने जावे हा प्रश्न तिला पडतो .शिवाय तिला एक मुलगी होती. तलाक दिल्यानंतर तिला पर्याय शिल्लक उरत नाही मग ती आपल्या मुलीसाठी मिळेल ते काम करते. पण हा वनवास तिच्या जिव्हारी येतो आणि शेवटी आपल्या मुलीसह ती प्राणत्याग करते . संस्कारक्षम भारतीय कुटुंब व्यवस्था असतानादेखील आजही अशा घटना घडताना आपण पाहतो हे टाळण्यासाठी प्रत्येक घरातून महिषासुरमर्दिनी चा अवतार घेणारी स्त्री घडायला हवी.
कथासंग्रहातील बऱ्याच कथा स्त्रीप्रधान कथा आहेत. प्रत्येक कथेतून सकारात्मक बोध घेता येईल अशी परिपक्व कथा लेखन करण्यात कथालेखिका यशस्वी झालेल्या आहेत. लेखन प्रतिभा ही स्वतःची उपजत असते. ती विकत घेता येत नाही. अनुभवातून ती फुलत जाते आणि त्या विचारांचे कथेत रुपांतर होत जाते. या सर्व कथा विषयाची जाण ठेवून लिहिल्या गेल्या आहेत.
परिवर्तन ही काळाची गरज असते. आजच्या स्त्रीने एक पाऊल उचलून आपल्या साहित्यातून समृद्ध लेखन करत असताना या सर्व सिध्द लेखिका निश्चितच स्त्री शक्तीचे प्रतिनिधित्व करतील यात शंका नाही. सर्व सदस्यांना पुढील साहित्य वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!
सौ. मैथिली महेंद्र कुलकर्णी, नांदेड
टिप्पण्या