Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
पुस्तकाचे नांव----- सांजधुन
मूळ लेखक---- श्री मोहनलाल गुप्ता
अनुवाद--- उज्ज्वला केळकर
सांजधुन हा उज्ज्वला केळकर यांचा अनुवादित कथासंग्रह आहे. तो दिवस, तुझ्यासाठी, नाटक, अचानक, जैपडॉल, मोरिया, सांजधून, निळा ठिपका, सरदार पूर्णसिंह, व्हिटॅमिन डी, ऑपरेशन,कुत्री, वाटणी, आजोळ घरी अशी नाविन्यपूर्ण शीर्षक असणाऱ्या चौदा कथा या कथासंग्रहात आहेत. हिंदी भाषेतील श्री.मोहनलाल गुप्ता यांनी लिहीलेल्या कथांचे अनुवाद उज्वला केळकर यांनी मराठी भाषेत केले आहे.जीवनातील सार यात मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कथांमधून मानवी जीवनाशी निगडीत असलेले वेगवेगळे विषय हाताळले गेले आहेत.
श्रीनगर आणि जम्मू कश्मीर या भागामध्ये आतंकवाद्यांची दहशत आणि त्या परिस्थितीत तेथे येणारे प्रवासी कुटुंब प्रिया, तिचा लहानगा कनु व तीचे पती यांच्या भोवती कथा गुंफली आहे. त्यांच्या मनाच्या अवस्थेचा उलगडा तो दिवस या कथेतून केला गेला आहे.
तुझ्यासाठी या कथेमध्ये प्रियकर प्रेयसीवर प्रेम करतो पण तरीही तो तिला नकार देतो. नकार देण्याची कारणे तो तिला पत्र लिहून कळवतो.. तो म्हणतो....
"माणसाकडे माणूस म्हणून बघावे..माणसाला देव मानण्यामुळेच सगळ्या अडचणी आणि सगळे वाद निर्माण होतात."
जैपडॉल ही एक वेगळ्याच पठडीतील कथा म्हणता येईल.नायक एका पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतो. त्याला श्रोत्यांच्या रांगेत एक व्यक्ती दिसते.त्या व्यक्तीस पाहताच नायकाच्या स्मृती चाळवतात. भूतकाळातील गोष्टी त्यांच्या मनात भराभर येऊ लागतात. शेवटी एक प्रश्न येतो की, ती कोण..? तर...जैपडॉल म्हणजे जपानी बाहुली. आणि जैपडॉल सारखी दिसणारी ती म्हणजे नायकाच्या काॉलेजजीवनातील प्रेयसी असते.
मोरिया ही कथा काहीशी वेगळी आहे. ही कथा दोन भावांच्या सखोल निरोगी नात्यांची..पण नात्यांची सूत्र लोभापायी कशी तुटतात याचा अनुभव देणारी ह्रदय स्पर्शी कथा आहे.
सांजधुन ही शीर्षक कथा म्हणजे सुगंधा या संगीत शिक्षीकेची आहे.तिच्या विद्यार्थ्याशी असलेल्या प्रेमभावनेची कथा आहे.
कुत्रा ही कथा मनाला स्पर्शून जाते.एका झोपडीत,कुत्र्याच्या मानसिकतेनं आणि झुरळासारखी जगणारी ,एकाच कुटुंबातल्या माणसांच्या जीवनाची कहाणी वाचतांना मन सुन्न होऊन जातं...पण जीवनाची ही गलिच्छ बाजू नाकारता येत नाही..अखेर तेही एक वास्तव च आहे... हे मान्य करावेच लागेल.कथा मनावर परिणाम करणाऱ्या आहेत. त्या वाचताना वाचकाचे मन हताश, व्याकुळ होऊन जाते.
सर्वच कथा वाचनीय आशा आहेत.उज्ज्वला केळकर यांच्या पुस्तकातील शब्दांची मांडणी मनाला भावणारी असते. पुस्तक वाचताना ते अनुवादित आहे हे कोठेही जाणवत नाही. हे त्यांच्या लेखन कौशल्याचे यशच म्हणावे लागेल.
टिप्पण्या