Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
शिवलीलामृत परायण विधी,शिवलीलामृत पारायण फायदे ..... महिती...
भगवान शंकराची आराधना करणाऱ्या अनेक भक्तांसाठी शिवलीलामृत पारायण म्हणजे एक अमृत पर्वणी. शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण आपण अनेक वेळा केले असेल. पण हा ग्रंथ कोणी रचला? या ग्रंथाचे लेखक कोण? याची आपल्याला फारशी माहिती नसते. शिवलीलामृत हा ग्रंथ आपण वाचतो खरा... पण त्याचे काय फायदे आहेत हेही आपल्याला माहीत नसते. मनाची शांती, समाधान हाच याचा उत्तम फायदा म्हणता येईल. याच सोबत अनेक भक्तांना या पारायणाचे वेगवेगळे लाभ झालेले आहेत.
शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन आपली संकटे दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात तसेच इच्छित फळ मिळावे यासाठी उपयुक्त आहे. या ग्रंथाचे संपूर्ण पारायण एका सप्ताहात पूर्ण करावे.
कोणत्याही सोमवारी सायंकाळी शिव मंदिरात जाऊन बेलाची अकरा त्रिदले पिंडीवर वहावीत व शंकराचे दर्शन घ्यावे. आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने आपण जर हे पारायण करत असू तर त्या गोष्टीचा उच्चार करावा आणि सात दिवसात रोज अंशतः याप्रमाणे पारायण करावे. मनोमन भगवान शिव शंकराची उपासना करावी आणि हाती घेतलेले हे सप्ताह पारायण निर्विघ्नपणे पार पाडून इच्छित फल देण्याची प्रार्थना करावी. शिवलीलामृताचे पारायण स्वतःच्या घरी किंवा मंदिरात करता येते. पोथीचे पारायणाचे अध्याय खालील प्रमाणे वाचावे..
सोमवार .....अध्याय 1,2
मंगळवार .....अध्याय 3,4
बुधवार ... .अध्याय 5,6
गुरुवार ..... अध्याय 7,8
शुक्रवार ......अध्याय 9 व 10
शनिवार ...अध्याय 11,12
रविवार .....अध्याय 13, 14
*शिवलीलामृताच्या काही पोथींमध्ये पंधरावा अध्याय घेण्यात आला आहे. तो असेल तर रविवारी वाचावा*
रविवारी रात्री आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवावा व प्रसाद म्हणून ते अन्न स्वतः सेवन करावे.
१) शिवलीलामृत पारायणाचे उद्यापन म्हणून वाचन झाल्यावर त्याच दिवशी शिव मंदिरात जावे व शंकराला अकरा बेल त्रिदले वहावीत.
२) एक कलश पाणी अभिषेक करावा.
३) यथाशक्ती तांदूळ व द्रव्य अर्पण करावे.
४) साधूला दक्षिणा व शुभ्र वस्त्रदान करावे.
५) पोथी मध्ये " शिवमानसपूजा" असेल तर ती आधी वाचावी व नियमाने दोन अध्याय वाचावीत आणि शेवटी शिव स्तोत्रे म्हणावीत.
६) ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा सर्वांनी स्वतः पोथी वाचनापूर्वी 108 वेळा जप करावा.
*शिवलीलामृताच्या पारायणाने होणारे फायदे*
*या ग्रंथाचे पारायण केल्याने सर्व दुःख दुर होतात.
* या परायणाने सद्गुरूंची कृपा होते. कामे मार्गी लागतात.
* या परायणाने संकटे टळतात, आपत्ती टळते, उत्तम फळ मिळते.
*वादविवादात विजय होतो. यश कीर्ती वाढते.
* शिवलीलामृताचे पारायण केल्याने गिरी प्रदक्षिणा केल्याचे फळ मिळते.
* शिवलीलामृताच्या पारायणामुळे आयु , आरोग्य , धन व उत्तम पुत्र संतती प्राप्त होते.
* शिवलीलामृताच्या पारायणाने भक्ताची सर्व पापे नष्ट होऊन तो भक्त शिव कृपेस पात्र ठरतो
पुस्तक/ग्रंथ --श्रीशिवलीलामृत (मराठी)
रचनाकार ---- श्रीधरस्वामी नाझरेकर
प्रकाशक, मुद्रक--- गिताप्रेस, गोरखपूर
मूल्य--- ₹६०/-
श्रीधरस्वामी १७ व्या शतकातील प्रसिद्ध आख्यानकवी होते. त्यांचा जन्म इ. स.१६५८ च्या आसपासचा. ते मुळचे नाझरे या गावचे. श्रीधरस्वामी यांचा जन्म नाझरे याचं गावी झाला. हे गाव पंढरपूर पासून जवळपास ५० कि. मी. अंतरावर आहे. श्रीधरस्वामी नाझरे हे काशीच्या आनंद संप्रदायातील आठवे वंशज. त्यांच्या वडिलांचे नाव ब्रम्हानंद आणि आईचे नाव सावित्री होते.
त्यांचे कुटुंब पुढे पंढरपूरात स्थाईक झाले. तेथे राहुनच श्रीधरस्वामी पुराण- प्रवचने करून भक्तिमार्गाचा प्रसार करु लागले.ओवीबद्ध रचना करू लागले. त्यांचे मधुर रसाळ कीर्तन ऐकण्यासाठी जनसमुदायाची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली. आपण जे विचार कीर्तन- प्रवचनातून लोकांसमोर मांडतो ते ग्रंथ रुपाने लोकांसमोर आले तर जनतेस त्याचा अधिक लाभ होईल या उदात्त हेतूने त्यांनी पुराणकथा मराठी भाषेत ओवी छंदात लिहिण्यास प्रारंभ केला. त्यांचा पहिला ओवीबद्ध ग्रंथ हरिविजय हा होय. यानंतर त्यांनी अनेक पदे स्तोत्रे यांची त्यांच्या ग्रंथातून रचना केली.
श्रीधर स्वामी हे थोर भगवदभक्त संत होते. त्यांची भाषा संस्कृत असली तरी साधी व प्रासंगिक आहे. त्यांच्या उत्तम वर्णन शैलीमुळे वाचकांचे चित्र आणि मन ग्रंथातील विषयात गुंतून राहते. त्यांचे काव्य भक्तीरस प्रधान आहे. धर्मशास्त्र अध्यात्म यांची माहिती त्यांच्या ग्रंथातून वाचकांना होते.
शिवलीलामृत हा १४अध्यायाचा ग्रंथ आहे. २४५३ ओव्या त्यात आहेत. हा ग्रंथ त्यांनी काशी विश्वनाथाच्या मंदिरात बसून लिहिला. त्यासाठी त्यांनी स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडांचा आधार घेतला. शिवाची उपासना करणाऱ्यांना या ग्रंथाचा नक्कीच लाभ होईल.
अंबिका उदय
पांडवप्रताप
पांडुरंग माहात्म्य
मल्हारी माहात्म्य
रामविजय
व्यंकटेश माहात्म्य
शिवलीलामृत
हरिविजय
ज्ञानेश्वर चरित्र
*शिवलीलामृत*----
महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील शिवभक्त शिवलीलामृताची पारायनं करतात.
शिवलीलामृताच्या अकराव्या अध्यायाला विशेष महत्त्व आहे. काही ठिकाणी शिवलीलामृताची १५ अध्याय आहेत असे मानले जाते. पण त्यात तथ्यता आढळत नाही.
व्यास ऋषींनी स्कंदपुराणात ब्रम्होत्तर खंडामध्ये शिवलीलामृताचे वर्णन केले आहे. तोच हा शिवलीलामृत ग्रंथ होय. एकदा सर्व ऋषी गण जमले असता ऋषीमुनींनी सूतमुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली. तेव्हा सुतमुनींनी "ओम नमः शिवाय" या शिव मंत्राचा महिमा सांगितला. पंचाक्षरी सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. या मंत्राच्या प्रभावाची कथा त्यांनी पहिल्या अध्यायात सांगितले आहे.दशार्ह राजा उदार व सलक्षणी असला तरी तो कमांध होता. कलावती ही त्याची अतिशय सुंदर पत्नी व्रतस्थ असताना त्याने तिला शयनगृहेत येण्यास सांगितले. तिने राजाला नम्रपणे नकार दिला आणि स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्थ वृद्ध अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले. पण राजाने दुर्लक्ष करून तिला बाहुपशात घेतले. त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले. राजाने कारण विचारता कलावती राणीने शिवपंचाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले. राजाला पश्चाताप झाला त्याने विधी व त्या मंत्राची दीक्षा घेतली व नित्य शिवपंचाक्षरी मंत्र जपू लागला.
व्यास ऋषींनी दुसऱ्या अध्यायात माघ महिन्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे माग महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात मृग परिवार व व्याधाची कथा यात आहे. तिसऱ्या अध्यायात मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महात्म्य सांगण्यात आले आहे. किरात देशाचा राजा विमोशन व त्याची पत्नी राणी कुमुदवती यांची कथा चौथ्या अध्यायात आहे. एके दिवशी राणी राजाला विचारते की शिव पूजा करूनही तुम्ही अधर्माने का वागतात? तेव्हा राजा तिला त्याचा पूर्व इतिहास सांगतो.हे वर्णन म्हणजेच चौथा अध्याय होय.
शिवलीलामृताच्या पाचव्या अध्यायात सत्य रथ राजाची कथा सांगितली गेली आहे. प्रदोष व्रताचे महात्म्य यात स्पष्ट केले आहे तसेच हे व्रत केल्याने अकाली मृत्यू गंडांतर येत नाही हेही सांगण्यात आले आहे.
आर्यवर्तचा राजा चित्रवर्मा सत्वशील व पुण्यवान होता. त्याला सीमंतिनी नावाची रूपवती कन्या होती. तिची कथा सहाव्या अध्यायात सांगितली आहे. तसेच हे आख्यान ज्या स्त्रिया श्रवणन व पठण करतील
त्यांचे सौभाग्य वाढेल , दूरदेशी गेलेल्या पती परत येईल हेही सांगण्यात आले आहे. सातव्या अध्यायामध्ये गुरुकृपा व गुरु मंत्राचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आठव्या अध्यायात भद्रायू आख्यान सांगितले आहे. जिथे शिवनामाचा गजर रात्रंदिवस असतो तिथे जन्म मरण संसार भय यांचे अस्तित्वच नसते. वामदेव व ब्रह्मराक्षस यांची कथा यात सूज सांगतात. अनर्थ देशातील देव रथ नावाच्या ब्राह्मणाची कथा दहाव्या अध्यायात आहे.
अकराव्या अध्यायात रुद्राक्षाचे महत्व सांगितले गेले आहे. दीर्घायुष्य व उत्तम संतती प्राप्त होण्यासाठी या ११ व्या अध्यायाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाराव्या अध्यायामध्ये बहुलेचा उद्धार आहे. बहुला ही एक व्याभिचारी स्त्री होती. शिवरात्र पर्व सुरू असताना एकदा बहुला भटकत गोकरणास आली. शिवमंदिरात बसली असता तिने पापकर्माचे वर्णन ऐकले. तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. तेव्हा मंदिराच्या पुजाऱ्याने तिला "नमः शिवाय" या मंत्राचा उपदेश केला. या प्रभावाने ती पापमुक्त झाली. शिवमंत्र,शिवकथा, त्याचे श्रवण, शिवदीक्षा, रुद्राक्ष धारण, भस्मलेपन याचे महत्त्व अपार आहे.
तेराव्या अध्यायामध्ये दक्षयज्ञाचा विध्वंस ,त्रिपुर दहन, शिवपार्वती विवाह ,तारकासुराचा वध सुतांनी सांगितले आहे. स्कंद पुराणातील या कथा श्रवणामुळे सर्व दुःख दूर होतात. शिवलीलामृताच्या चौदाव्या आणि शेवटच्या अध्यायात सुतमुनी शिवलीला सांगतात. शिवलीलामृताचा हा चौदावा अध्याय म्हणजे सर्व अध्यायांचा सार आहे. या ग्रंथाचे पठण केल्याने आयु ,आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होते. शंकराचा आशीर्वाद सर्व भक्तांवर अखंड राहतो. भक्त शिवलोकी जातो.असे हे १४ अध्यायांचे शिवलीलामृत ग्रंथ आहे.
मनःशांतीसाठी या ग्रंथाचा रोज एक अध्याय तरी नक्की वाचावा.
©® मैथिली कुलकर्णी
दत्त लहरी (अनुवादक - प्रा. रमेश भारदे)| Datta Lahari
टिप्पण्या