Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

भारत सासणे|Bharat sasne|दाट काळा पाऊस|९५ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

 प्रस्तावना:- 

     ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड झाली. यापूर्वी भारत सासणे यांचे पुस्तक वाचण्याचा कधी योग आला नाही. लेखक म्हणून ते परिचित असले तरीही त्यांचे पुस्तक कधी वाचनात आले नव्हते. उत्सुकतेपोटी त्यांची माहिती सर्च केली आणि त्यांची महती कळत गेली. एवढ्या मोठ्या इसमाचे एखादे पुस्तक तरी आपण वाचलेच पाहिजे असे वाटतं होते. माझे वाचनवेड लक्षात घेता वाढदिवसाचे औचित्य साधून बहिणीने " दाट काळा पाऊस" हे भारत सासणे यांचे पुस्तक मला भेट कारणे हा ही एक योगायोगच... झपाटल्यागत पुस्तक वाचण्यास सुरुवात झाली. भारत सासणे यांच्या लेखणीची प्रगल्भता च एवढी आहे की, प्रामाणिक मत मंडायचे झाल्यास एकदा वाचून हे पुस्तक समजत नाही. वारंवार वाचनातून त्यांचीलेखन शैली उलगडत जाते. त्यासाठी त्यांची पुस्तके वाचावी लागतात.

पुस्तकं:- 

           दाट काळा पाऊस ( दीर्घ कथा संग्रह)

 लेखक:-

            भारत सासणे

प्रकाशन:- 

            मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

किंमत:- 

              ₹ ५००/-

लेखक परिचय:-

      भारत सासणे यांचा जन्म २७ मार्च १९५१ मध्ये जालना येथे झाला. अहमदनगर महाविद्यालयातून बी. एस. एस्सी. पदवी त्यांनी घेतली. विविध शासकीय अधिकारी पदांवर नोकरी त्यांनी केली आहे. उदगीर येथे होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे.


*भारत सासणे यांनी लिहिलेली पुस्तके*

१) जान आणि अंजिरी पक्षी (प्रथम कथासंग्रह)

२) लाल फुलांचे झाड ( कथासंग्रह)

३) आयुष्याची छोटी गोष्ट (कथासंग्रह)

४) अनर्थ रात्र (दीर्घ कथा संग्रह)

५) अदृष्ट (दीर्घ कथा संग्रह)

६) आतंक (नाटक)

७) चिरदाह (दीर्घ कथा संग्रह)


८) दुर तेव्हा तेथे दूर तेव्हा/सर्प (दोन कादंबरीका)

९) दोन मित्र (कादंबरी)

१०) दाट काळा पाऊस ( दीर्घ कथा संग्रह)


*दाट काळा पाऊस:--

      प्रसिद्ध लेखक भारत सासणे यांनी अगदी अलीकडेच म्हणजे २०२० साली आपल्या प्रगल्भ लेखणीतून साकारलेली कलाकृती म्हणजे "दाट काळा पाऊस". रविमुकुल यांचे मुखपृष्ठ आणि मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस प्रकाशनचे हे पुस्तक म्हणजे सहा दीर्घ कथांचा संच आहे. ३७२ पानांचे हे पुस्तक सहा कथांमध्ये विभागले गेलेले आहे. प्रयोगशीलता हे भारत सासणे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. दीर्घ कथांचा हा प्रयोग त्यांनी ओढून ताणून शब्द मर्यादा वाढवून केलेला नसून तो यथायोग्य वाचकांच्या समोर आलेला आहे. या कथा एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या आहेत पण असे असले तरीही त्यांचा सार हा गुढ आहे. तो पटकन वाचल्याने समजत नाही. एखाद्या कळीचे जशे अलगद सुगंधी फुलात रूपांतर होते अगदी त्याच पद्धतीने कथा हळुहळू समजतं जातात. त्यांचा गभार्थ उकलत जातो.

         आय थिंक देअर फोर आय एम..., ब्यांन्नव दरवाजे, दाट काळा पाऊस, दुःखाचा अनुवाद, गहना कर्मणो गति, अ लाँग डिस्टन्स कॉल अशी या सहा कथांची नावे आहेत. या सहा कथा पुस्तक रूपात प्रकाशित होण्यापूर्वी वेगवेगळ्या दिवाळी अंकात त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे. तसा उल्लेख पुस्तकाच्या सुरुवातीलाच दिला गेला आहे. कथा वाचताना एक गोष्ट निदर्शनास येते ती अशी की या कथांमधील पात्र हे संवेदनशील तर आहेतच पण सामान्य मात्र नाहीत. सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला येणार जगणं त्यांच्या नशिबी नाही. या संग्रहातील "आय थिंक देअर फॉर आय एम" या पहिल्यावहिल्या कथेतील नायक याचे उदाहरण म्हणता येईल. तो ज्यावेळी या अवनीवर जन्म घेतो त्यावेळचा काळ तसा विचित्र च. भुकंपानंतर प्लेग सारखी रोगराई पसरलेला तो काळ. त्यात नायकाच्या आईला मूल होत नाही म्हणून ती एका "मुका महाराजांची" सेवा करते. त्यांचाच प्रसाद म्हणून की काय कथेच्या नायकाला ऐकू येतं, पण बोलता येत नाही. स्वतःच्या शरीरयष्टीला राजबिंडा नावाने संबोधनारा हा नायक आपल्या वयाच्या साठीच्या आसपास ही कथा मांडतो आहे. त्याचे बालपण आणि तारुण्य याविषयी सांगण्यासारखे असे विशेष काही नाही असे त्याला वाटते कारण तो व्यंग आहे. आपल्या भावना त्याला बोलून व्यक्त करायच्या आहेत. तसा तो प्रयत्नही करतो पण त्याच्या त त प प करीत बोलण्याचा अर्थ तोंडातून येणाऱ्या वेगवेगळ्या ध्वनीमुळे उकलत नाही.

         कथेच्या नायकाच्या त्याच्या जीवनाबद्दल त्याला बरेच प्रश्न पडतात ज्यांची उत्तरे त्याच्याजवळ नसतात. त्यामुळे अनंत वेळा त्याचा कोंडमारा ही होतो. भूतकाळ आणि वर्तमान काळ यांची सांगड घालून तो अर्थ उकलण्याचा प्रयत्न करतो. कथेतील पात्र हे "विश्व" नावाच्या एका इमारतीमध्ये वास्तव्य करत असतात.कथेचा नायक आणि त्यांचे वडील या दोन पिढ्यांमध्ये दुरावा आहे कारण वडिलांचे त्यांच्या भवांबरोबर पटत नाही. अशी विचित्र परिस्थिती का निर्माण झाली यावर नियती हेच उत्तर असावे असे नायकाला वाटते. कथा मांडत असताना बऱ्याच पात्रांचा त्यात समावेश झालेला आहे. उदबत्त्या विकणाऱ्या बाई पासून ते लायब्ररीच्या माणसांपर्यंत कथेच्या सोबत चालणाऱ्या या पात्रांना त्या त्या जागी योग्य न्याय मिळाला आहे. ओढून ताणून त्यांची मांडणी झालेली नाही.ही सर्व पात्र हळूहळू एकत्र येता येता कथा शेवटापर्यंत पोचते. 

         जुन्या कागदपत्रांवरून नायकाचा जन्म मुका महाराजांच्या निधनानंतर दोन अडीच वर्षांनी झाला हे सिद्ध होते. लायब्ररीची जुनी कागदपत्रही सापडतात. याच कागदांवरून नायकाचे वडील हे संस्थापकांपैकी एक असतात हे सिद्ध होते. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नायकाला होते आणि त्यामुळेच "मेन्यूपुलेशन" ला तो नकार देतो. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील, मनातील क्रोध, आवेग प्रभावीपणे प्रकट होतात. लेखक भारत सासणे यांच्या लेखणीतील प्रगल्भता कथा वाचताना प्रकर्षाने जाणवते.


कथेला अनुसरून येणारे संवाद मनाला स्पर्शून जातात.

"कुष्ठरोग शरीराचा नाही, मनाचा असतो इतरांना झालेला..."


"भूतकाळाला पक्षासारखं पाळता आलं असतं तर? मोठी बहार आली असती नाही? त्याला पिंजऱ्यात ठेवता आला असत. मोत्याचा घास भरवता आला असता. हृदयाजवळ धरून ठेवता आलं असतं. पण तसं शक्य होत नसत ना!"


"बोलता येत नसलं तरीही बोललं पाहिजे...

 नाहीतर बोलतं केलं पाहिजे आठवणींना!..." या वाक्यांमधून आर्तता लक्षात येते.

          चारही बाजूंना भिंती आणि मोठं फाटक, बंगल्यासमोर गोरखचिंचेच मोठं झाड असं वर्णन असणारा "पिवळा बंगला" "ब्यांन्नव दरवाजे" ही कथा वाचताना हुबेहूब डोळ्यासमोर दिसू लागतो. सामाजिक आणि राजकीय संदर्भ असणारी ही दीर्घकथा आहे. कथेचा नायक आपल्या वयाच्या १८ व्या वर्षापासून पुढील पंधरा वर्षापर्यंत त्याच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण करताना दिसतो. पिवळा बंगला आणि त्याच्याभोवती कथा गुंफली गेली आहे. या बंगल्यात बऱ्याच मोठ्या राजकीय माणसांची रेलचेल असते. कथेचा नायक रंग कामाचा व्यवसाय करतो. पिवळा बंगला रंगवण्याचे काम आपल्याला मिळावे हे त्याच्या वडिलांचे स्वप्न असते. त्यांच्या हयातीत ते पूर्ण होत नाही. आपल्या वडिलांचे हे स्वप्न पुढे मुलगा पाहू लागतो. पिवळ्या बंगल्याच्या रंगरंगोटीचे कंत्राट आपल्याला मिळावे अशी त्यांची मनापासून इच्छा असते. त्यादृष्टीने तो प्रयत्नही करतो व पुढील काळात पदरात पाडून नही घेतो.


        पिवळ्या बंगल्यात स्वातंत्र्यपूर्व काळातील घडामोडींची चर्चा होत असते. नेहरूंपासून मदन मोहन मालवीय पर्यंतचे मोठे पुढारी या बंगल्यावर येऊन गेलेले आहेत. मलवियाजी यांचे पुत्र कथा नायकाला भेटलेले आहेत. या सर्व राजकीय वातावरणाचा कथानायकाच्या मनावर खोल परिणाम झालेला आहे. त्याच्या स्वानुभवामध्ये त्याच्या सोबतीला वेडा रघु आहे. केसांचा पिसारा फुलवणारी आणि नायकाला आकर्षित करणारी तरुणी आहे. कथा जसजशी पुढे पुढे जाते तसतशी यांची प्रेम कहाणी पूर्णत्वास पोहोचते. पिवळा बंगल्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक ,धार्मिक स्थित्यंतराच्या अनुषंगाने महत्त्वाच्या प्रश्नांचे संदर्भही यात आलेले आहेत. लेखक भारत सासणे यांनी कथानायक प्रगल्भ विचारसरणीचा आहे असे न दाखवता अगदी कोवळा, तारुण्यात प्रवेश केलेला, ज्याला अजून प्रगल्भता नाही, जीवनाविषयीचे कुतूहल असणाऱ्या पात्रास दर्शविले आहे. त्यामुळे कथानायक हा भारावलेल्या मनोवृत्तीचा जाणवतो. त्याच्या जीवनातील प्रेमभावना, मदन मोहन मालवीय यांचे समंजस, समतोल विचार, त्यांच्या अनुयायांमध्ये असणारा सामंजस्याचा अभाव, राजकीय मतं-मतांतर व त्यातून होणाऱ्या दंगली ,जाळपोळ आणि या सर्व घटनांचा सामान्य जन माणसावर उमटणारा परिणाम, त्यांची मानसिकता या कथेतून मांडण्यात आली आहे.

              "दाट काळा पाऊस" ही या संग्रहातील तीसरी कथा.अनेक वर्षांपासून मनात साठलेल्या विचारांच्या ढगांना तिसऱ्या टेकडीवरील आपल्या मित्राच्या घराचा थंड वारा लागतो आणि कथानायकाच्या विचारांचा बांध फुटून सर्वत्र धो-धो पाऊस बरसू लागतो. वातावरण निर्मिती हे भारत सासणे यांच्या "दाट काळा पाऊस" मधील कथांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांनी केलेल्या वर्णनातून वाचक तो पाऊस अनुभवतो. त्याचे शिंतोडे वाचकाच्या मनावर पडतात. पुणे ते मुजफ्फरपुर हा प्रवास आणि त्या प्रवासात धो-धो कोसळणाऱ्या पावसातील कथानायकासोबत घडलेल्या घटनांचे वर्णन लेखकाने मोठ्या रंजकतेने मांडले आहेत. काळोखाला चिरून, पावसाला भेदून नायक आपल्या मुक्काम स्थळी पोहोचतो. दरवाज्यावरची बेल वाजवतो आणि रोहिणी दार उघडते. येथूनच कथेस सुरुवात होते. मनोहर हा कथानायक व सुधीर आणि रोहिणी हे त्याचे मित्र असतात. सुधीर च्या आईने तिच्या शेवटच्या दिवसात मनोहरला दिलेला चेक त्याच्या जवळच राहतो. तसेच सुधीरने लिहिलेली पत्र रोहिणीला तो देत नाही. ती पत्रही त्याच्याजवळच असतात. आज पर्यंत जपून ठेवलेली ही ठेव त्याने का जपून ठेवली त्याचाच उलगडा करण्यासाठी तो रोहिणी ची भेट घ्यावी म्हणून आलेला असतो. जवळजवळ पंचवीस वर्षांपूर्वी च्या सर्व घटना तो तिला सांगतो. ती सर्व शांतपणे ऐकून घेते. झाल्या अपराधाची कबुली देण्यासाठी तो आलेला असतो. पण आश्चर्य म्हणजे या सर्व घटना सुधीर आणि रोहिणीला सुधीर च्या आईने सांगितलेल्या असतात. सर्व घटना माहीत असूनही ते मनोहर वर अविश्वास न दाखवता त्याला समजून घेतात व त्याच्यासोबत ची मैत्री अबाधित ठेवतात. या संदर्भातील उलगडा मनोहरला रोहिणीशी बोलताना होतो. मनावरील दडपण दूर करून मनोहर मोकळा श्वास घेऊन परतीच्या प्रवासाला लागतो. त्याच्या मनातील अपराधी भाव व त्यातून त्याला वाटणारा आत्म दोष आणि त्याची होणारी कोंडी यावर ही संपूर्ण कथा आहे. कथेमध्ये मुस्लिम पात्र असल्यामुळे जाणीवपूर्वक उर्दू शब्दांचा वापर केला गेला आहे. दाट काळया पावसाची सोबत घेऊन सुरू होणाऱ्या या प्रवासात संपूर्ण परिसराचे वर्णनही स्पष्ट आणि ताकदीने दिसते. जाणवते.

           "दुःखाचा अनुवाद" ही चौथी कथा वाचताना कथा जसजशी पुढे सरकत जाते तसतसा कथानायक वाचकांशी संवाद साधतोय असे वाटते. हा नायक थोडासा प्रौढ आहे. त्याचे केस पांढरे झालेले आहेत तो बुद्धिवान आहे शिवाय बुद्धिबळ खेळतो लोकांच्या समस्यांवर सल्लेही देतो. स्वतःच्या आजोबांनी विकसित केलेल्या परिसरात तो राहतो. बिस्किट कारखान्याचा मॅनेजर आपल्या भाच्याची अनिरुद्ध ची गाठ नायकाशी घालून देतो. अनिरुद्ध एक पत्र नायकाला दाखवतो. या पत्रामुळे अनिरुद्ध च्या जीवनात निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी नायकाने मदत करावी अशी तो विनंती करतो. नायक अंबिका नावाच्या मुलीकडे त्याला घेऊन जातो नमु चा पत्ता तिच्याकडून अनिरुद्धाला समजतो. अनेक भेटीनंतर अंबिका हीच नमु आहे असे निष्पन्न होते. तू या अंबिकेचा प्रेमात पडतो तिने ते ४२ हजारांचे पाकीट संबंधितांना दिलेलेच नसते. अनिरुद्ध तीला कसल्याशा गुन्ह्यातून वाचवणार असतो ते दोघे पळून जातात. मृत्युपूर्वी नायकाची वडील नायकाच्या हाती एक कवितेचा कागद देतात. ज्यात प्रॉमिस ही गोष्ट महत्त्वाची असते. आपल्या वडिलांनी आपल्याला हे कागद का दिले असेल याचा नायकाला उलगडा होत नाही नायकाची प्रकृती ही बिघडते. वडील व आजोबां प्रमाणेच नायकाला आजार असतो. मृत्यु पावलेले वडील सतत दिसत राहणे हा या आजाराचा एक भाग. अनिरुद्ध आणि अंबिका यांचे जीवन फुलते खरे पण पोलीस त्यांचा शोध घेऊ लागतात . त्यातून गुंतागुंत वाढत जाते . कथेमध्ये प्रचंड कल्पकता जाणवते. आंतरिक अशांततेतून शांततेकडे जाणारा नायक. 

 ही कथा वाचताना प्रकर्षाने दिसतो.

"गहणा कर्मणो गति" ही देखील अशीच गुंतागुंत असणारी कथा आहे. वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती अण्णा मामा या पात्राची संवाद साधतात. आणि या सगळ्यांना एकत्र आणणारी एक व्यक्ती म्हणजे सत्यजित नावाचा समस्याग्रस्त मुलगा. एकमेकांच्या संवादातून ही कथा रुपाला आली आहे. अण्णा मामा एक प्रश्न उपस्थित करतात त्यावर सर्व जण आपापले मत मांडतात त्यांच्या प्रश्नोत्तरातून कथा पुढे पुढे सरकते. सत्यजित ची समस्याग्रस्तता, इस्टेटी संबंधीच्या अपेक्षा, श्रीधर चे काय झाले या विषयांवर प्रत्येकाचे मत वेगळे आहे. कर्माची गती गहन असते हा वाचकाच्या मनावर रुजवण्यासाठी रहस्यमय रीतीने दीर्घकथा पूर्णत्वाकडे नेण्यात लेखकाला यश आले आहे.

"अ लाँग डिस्टन्स कॉल" या कथेतील नायक हा देवस्थानांचा संशोधक आहे. तो त्रिमुखी गणेशाची मूर्ती पाहण्यासाठी तिचा शोध घेण्यासाठी ओव्याला निघाला आहे. वाटेत अडचण आल्यामुळे त्याला लॉजवर थांबावे लागले आहे. इतर कथेतील वाचकांना प्रमाणे तो ही हुशार आहे. लॉज वरील लोकांच्या समस्या तू सोडवतो. त्रिमुखी गणेश मूर्ती चा शोध घेत असताना त्याला असे लक्षात येते की या मूर्तीला चार मुख असून ते दिसत नाही एका फोन मुळे हा प्रश्न समोर येतो कथेची मांडणी प्रयोगशील आहे. या कथेमध्ये ही हिंदू उर्दू शब्दांचा उल्लेख आढळतो.

भारत सासणे यांच्या कथांमधील नायक तरुणच असावा असा त्यांचा अट्टाहास नसतो. मुळ कथाबीज आणि त्याच्याभोवती फुलणारी ती कथा असते. त्यांच्या कथांमधून स्वानुभवता जाणवते अंतर्मुखता दिसते संपूर्ण कथा वाचत जेव्हा वाचक शेवटाकडे वळतो तेव्हा एक अस्वस्थ जीव आणि त्याने शांततेसाठी केलेले वर्तन असा कथांचा मूळ गाभा असल्याचे जाणवते. अनुभव संपन्नता आणि प्रगल्भ लेखन यामुळे दाट काळा पाऊस वाचकांच्या पसंतीस उतरणार एवढे मात्र निश्चित.

     ©® सौ. मैथिली महेन्द्र कुलकर्णी

नटसम्राट (वी. वा.शिरवाडकर)|Natsamrat-Kusumagraj



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges