Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या आपल्या भारत भूमीवरील महाराष्ट्र हे मराठी साहित्य क्षेत्रातील बहुमोल असे राज्य. आज जगभरात मराठी साहित्यिक वसलेले असताना 2022 चे अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर येथे घेण्याचे कारणच मुळी सर्व काही सांगून जाते. मराठवाड्यातील साहित्यिकांच्या लेखनशैलीची छाप मराठीच नव्हे तर जगभरातील वाचक प्रेमी वर पडताना दिसून येते आहे. मराठवाड्यातील प्रतिभावंत साहित्यिकांची, त्यांच्या लेखनशैलीची मोहिनी माणसाच्या मनावर आशी पडते की, ती व्यक्ती कायमची आपली होऊन जाते. त्या व्यक्तीचे लेखन आपल्या मनावर राज्य करू लागते. त्यांच्या विचारांनी माणूस एवढा भारावून जातो की, त्यांची पाऊले आपसूकच साहित्य वाटेवर चालू लागतात आणि साहजिकच त्यांची पुस्तके परिवारातील सदस्य स्वरूप प्रत्येक मराठी साहित्यप्रेमींच्या घरात विराजमान होतात.
मराठी साहित्याचा समृद्ध वारसा पुढे घेऊन जाण्याचे दायित्व निर्विवादपणे सांभाळत अखंड साहित्य सेवेस स्वतःला झोकून देणारे आणि सोशल मीडिया तसेच लहान थोर मंडळींच्या विचार पसंतीस उतरून त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले असेच एक मराठमोळे नाव " कथा रंग " या कथासंग्रहाच्या रूपाने समोर आले ते म्हणजे अश्विनी निवर्गी.
वेगवेगळ्या विषयांवर परखड लेखन, स्पष्टवक्तेपणा आणि अंतकरणातून आलेली भावना कागदावर उतरवण्याचा हातखंडा हेच त्यांच्या लेखनशैलीचे आणि पर्यायाने त्यांच्या यशाचे, लोकप्रियतेचे मुख्य गमक म्हटले तर वावगे ठरू नये.
कथा रंग
अश्विनी निवर्गी
गणगोत प्रकाशन
₹१५०/-
नाव:- सौ. अश्विनी महेश निवर्गी
जन्म--- १५-१२-१९७२
शिक्षण----. एम. फिल( मेडिकल मायक्रो बायोलॉजी),
डी एम एल टी , एम एड, नेट
१) कोश (कवितासंग्रह)
२) कथा रंग (कथा संग्रह)
३) शब्दातीत (कथासंग्रह)
४) अर्थ (कथासंग्रह)
५) ती (कथासंग्रह)
६) ओंजळ कवितांची भाग-1
७) कोणत्या कवितांची भाग 2
अश्विनी निवर्गी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठवाड्यातील आंबेजोगाई येथे झाले. बीएससी मायक्रोबायोलॉजी योगेश्वरी महाविद्यालय, आंबेजोगाई येथे तर एम एस सी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, औरंगाबाद येथे झाले. तमिळनाडू येथील अण्णामलाई युनिव्हर्सिटीमधून त्यांनी एम फील केले.
निशिगंधा वाड एज्युकेशन अंड कल्चरल ट्रस्ट तर्फे प्रकाशित करण्यात आलेला शांताई साहित्याचे गोंदन या पुस्तकात अश्विनी निवर्गी यांच्या कवितेचा समावेश आहे.
अध्यापनाचे कार्य केलेले असल्यामुळे प्रशासकीय अनुभव त्यांना आहे .अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही त्यांनी केलेले आहे. त्यांचे लेखन अनेक वृत्तपत्रे, मासिके ,दिवाळी अंकात प्रकाशित आहेत .अश्विनी निवर्गी यांनी केलेल्या साहित्य लेखनास अनेक पारितोषिकेही मिळाली आहेत.
१) साहित्य दरबार तर्फे आयोजित राज्यस्तरीय लेख स्पर्धा 2022 मध्ये प्रथम पारितोषिक.
२) भाव अनुबंध दिवाळी अंक 2021साठी राज्य स्तरीय कथा लेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक
३) सूर्यांश साहित्यिक व सांस्कृतिक मंच चंद्रपूर तर्फे आयोजित राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा 2021 सर्वोत्कृष्ट पारितोषिक
४) विश्व मराठी परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक कथा लेखन स्पर्धा 2020 विशेष पारितोषिक.
५) मुंबई तरुण भारत दिवाळी अंक 2020 राज्यस्तरीय कथा लेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक
६) स्मृतीगंध राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा 2020 तृतीय पारितोषिक
७) आरंभ त्रैमासिक व अर्थ मराठी यांनी आयोजित केलेल्या राज्य स्तरीय लेख स्पर्धा 2020 उत्तेजनार्थ पारितोषिक.
८) चाळीसावे मराठवाडा साहित्य संमेलन, उदगीर येथील सुंबरान या स्मरणिकेच्या संपादन मंडळात कार्य
९) रंगकर्मी प्रतिष्ठान, उदगीर चा राज्यस्तरीय पुरस्कार
१०) कै.बापूसाहेब एकंबेकर महाविद्यालय उदगीर तर्फे स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार
११) जिव्हाळा ग्रुप उदगीर तर्फे कोरोना काळात महिलांना लिहिते केल्याबद्दल कोरोना योध्दा सन्मान.
माननीय डॉ. विजयाताई वाड, माधुरीताई घारपुरे, प्रा.भु.द.वाडीकर, प्रवीण दवणे सर यांसारख्या मोठ्या लेखकांच्या शुभेच्छा आपल्या पुस्तकांना मिळणे हे मोठे भाग्यच.... अश्विनीताई यांच्या दर्जेदार लेखन यांमुळे त्यांना हा मान मिळाला आहे.
अश्विनी निवर्गी लिखित गणगोत प्रकाशनाचा "कथारंग" हा प्रथम कथासंग्रह आहे.
प्रसिद्ध कवी लेखक प्राध्यापक प्रवीण दवणे सर यांनी प्रस्तावनेतून कथासंग्रह विषयीचे आपले मत शुभेच्छांच्या रूपात यात मांडले आहे. एकूण अठरा कथांचा समावेश असलेल्या या कथासंग्रहातील प्रत्येक कथेचा सार वेगळा आणि अर्थपूर्ण असा आहे. स्त्रियांच्या मनातील सुख-दुःख त्यांच्या व्यथा या कथासंग्रहात मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
किल्ली , भोंदू बाबा ची फजिती, कालाय तस्मै नमः, ऑनलाइन गुरुजी, सुरुची किचन वारी, न्याय अशा नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण शीर्षकाखाली लिहिलेल्या कथा वाचण्याजोग्या आहेत.
वेगवेगळ्या धर्तीवर अर्थपूर्ण अशा अति लघुकथा लिहिणं हे आव्हानात्मक असतं. अनोख्या कथां सोबतच अति लघुकथांचा ही यात समावेश केला गेला आहे. हा खरंतर एक वेगळा प्रयोग आहे. या धाडसाबद्दल लेखिकेचे अभिनंदन!!
भोंदू बाबा म्हणजे कोण? आजच्या पिढीतील बालगोपाळांना हा शब्दही माहीत नसावा मोबाइल लॅपटॉप च्या युगात भोंदूबाबा ची फजिती या बाल कथेतून मुलांना भोंदूबाबा समजतात. समाजात वावरत असताना अनेकांची फसवणूक करणाऱ्या भोंदुबाबा पासून दूर राहिले पाहिजे ही शिकवण ही कथा देऊन जाते.
मात ही कथा वाचताना माणसाचे मन चिरून जाते माणसातील पशु जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला काहीच दिसत नाही खोट्या प्रतिष्ठेचे पुढे स्वतःच्या मुलाचा जीव सुद्धा त्याला लहान होऊन जातो किती भयानक चित्र आहे हे!! वाचताना अंगावर शहारे येतात.
आपलं सारे आयुष्य सुखासमाधानात जावे या प्रयत्नात असणाऱ्या सुमती बाईंचा जीव सोनं या निर्जीव धातूत अडकून राहतो. सोन्याचा हव्यास करता-करता मोकळ्या हाताने त्या या जगाचा निरोप घेतात. शेवटी माणूस येताना आणि जाताना काहीच घेऊन येत जात नसतो. सर्व गोष्टी या पृथ्वीवर वावरत असताना मोहापायी,हव्यासापोटी घडतात. किल्ली या कथेतून याच मानवी प्रवृत्तीचे वर्णन केले गेले आहे.
सरपंच ,समानता, बैठक या लघुकथा असल्या तरीही त्यातून कथेचा संपूर्ण अर्थ उकलत जातो. स्त्री कितीही शिक्षित असली तरी ही समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत समाजाचा विकास होणे शक्य नाही. सरपंच मधून हेच विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
एखाद्या स्त्रीला आपले कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी हिरकणी होऊन गड चढल्यास पाहिजे असं काही नसतं. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक स्त्री ही एक हिरकणीचा आहे कुटुंब आणि नोकरी दोन्ही ती उत्तम सांभाळते. आपल्या सासूच्या आजारपणात त्यांची सेवा करणारी तन्वी ही आजच्या हिरकणी चे प्रतिनिधित्व करणारी स्त्री म्हणावी लागेल.
"कालाय तस्मै नमः" हे शीर्षकच वाचकाची उत्सुकता वाढवते.आभासी जगात करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या आजच्या पिढीला नातेसंबंध व त्यातील घट्ट वीण याची जाणीवच उरली नाही या कथेतून नेमक्या याच गोष्टीवर लेखिकेने वाचकांची लक्ष वेधले आहे.
अलक मध्ये आठ अतिलघु कथांना एकत्र गुंफले आहे. हे खरंतर खूप आव्हानात्मक आहे. अर्थ पूर्ण अलग वाचकांच्या मनात उतरवण्यात लेखिका यशस्वी झाल्या आहेत.
आरोग्य सेवा अखंड वाहून घेत समाज सेवा करणार्या प्रामाणिक डॉक्टरचा समाज मात्र परिस्थितीनुसार वापर करतो. आणि तोच डॉक्टर कधी देव माणूस बनतो तर कधी त्याला तुरुंगवासही भोगावा लागतो. मन हेलावणारी अशी डॉक्टरची व्यथा "देवमाणूस" या कथेतून लेखिकेने मांडली आहे.
"ऑनलाइन गुरुजी" ही अशीच एक सुंदर कथा. कोरूना या महामारी चा दोन वर्षात आपण सारेच कहर झेलतो आहोत. ऑनलाइन शिक्षणपद्धतीची आताश्या पालक विद्यार्थी आणि शिक्षकांना सवय झालेली असली तरीही सुरुवातीच्या काळात मात्र ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाला होता. विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील ऑनलाइन संवादाची खुमासदार वर्णन लेखिकेने या कथेतून केले आहे.
स्वतःच्या वडिलांच्या विकृत स्वभावाला कंटाळून त्यांचा खून करण्यात येतो आणि खून करणारे कमला आहे हे माहीत झाल्यावर देखील दिपांजली संपूर्ण विचाराअंती तिला यातून वाचवते आणि खरा न्याय करते. स्त्रीमधील खंबीर तेचे आणि परखड निर्णय क्षमतेचे दर्शन "न्याय " या कथेतून होते.
अश्विनी निवर्गी लिखित कथा रंग मधील सर्व कथा वाचण्याजोगे आहेत प्रत्येक कथेतून निघणारा बोध आणि त्यांची लेखन शैली यांमुळे हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरनार आहे!!
पुस्तक:- अर्थ
प्रकाशन:- गणगोत प्रकाशन
किंमत:- ₹ १५०/-
वेगवेगळे विषय हाताळून पंधरा कथांचा एकत्रित असा "अर्थ" हा अश्विनी नीवर्गी लिखित गणगोत प्रकाशनाचा कथासंग्रह. अर्थ ,विधिलिखित, खेळ ,झाड आणि पक्षी, भिंत ,गुंतले मन हे ,साक्ष, भूमिका ,समुद्री चहुकडे ,पाणी, आई, धडा ,माझा मराठीची बोलू कौतुके ,पायवाट ,वळण अशा नावीन्यपूर्ण अंतर्गत त्यांनी आपल्या कथा गुंफल्या आहेत.
प्रत्येक कथा ही वेगवेगळ्या वळणावरची आहे. अंतर्मनाला भावणारे शब्द खूप काही सांगून जातात. भिंत ही कथा मनाला स्पर्शून जाते. आयुष्य जगत असताना संसारा चक्रातील दोन्ही चाकं हे सक्षम असायला हवीत तरच ही आयुष्य नौका पार होऊ शकते. लेखिकेच्या कथांमधून ही गोष्ट प्रामुख्याने जाणवते. त्या नुसतं सांगतात असं नाही तर खंबीरपणे उभ राहत असताना प्रसंगावधान साधून जे जे करता येईल ते एका स्त्रीने केले पाहिजे हेही सुचवतात.
माननीय माधवीताई घारपुरे यांनी या कथासंग्रहाला शुभेच्छा देताना पुस्तक कसे आहे याबद्दल थोडक्यात लिहीलेआहे. त्यांच्या मतांशी या कथा तंतोतंत जुळतात.त्या म्हणतात....
"या कथा जाण असणाऱ्या ,जाणीव देणाऱ्या आहेत. जाग आणणाऱ्या, जागं करणाऱ्या आहेत.समज असणाऱ्या आणि समजवणाऱ्या आहेत."
पुस्तकप्रेमी वाचक जेव्हा हा कथासंग्रह वाचेल तेव्हा त्याचेही मत फारसे वेगळे असणार नाही. एवढे मात्र नक्की!!
©® मैथिली कुलकर्णी
*नक्की वाचा*
झाशीची वाघीण (zashichi waghin)|भास्कर महाजन (Bhaskar Mahajan)
टिप्पण्या