Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती
धर्म,श्रद्धा, अध्यात्म, या विषयावर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.आपण ते वाचतो. आकलनही करतो. "दत्तलहरी" हा असाच एक. अध्यात्मावर श्रद्धा, विश्वास असणाऱ्या लोकांबरोबरच प्रॅक्टिकल लाईफ जगणाऱ्या आजच्या पिढीलाही बोध देणारा हा ग्रंथ आहे.
पुस्तकाचे नाव--- दत्तलहरी (स्तोत्राचे मराठी ओवीबद्ध भाषांतर)
मूळ ग्रंथ---- महायोगी दलादन
अनुवादक---- प्रा. रमेश भारदे
प्रकाशन---- गीतामाई प्रकाशन
मूल्य---- ₹६०/-
जन्म---- २१ जून १९४४
शिक्षण--- एम. ए.( संस्कृत )
एम. ए. ( मराठी )
प्रा. रमेश भारदे सरांचे प्राथमिक शिक्षण शेवगाव येथे झाले.
महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर येथे झाले. व्यवसायाने ते प्राचार्य होते.
बाळासाहेब भारदे हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव येथे
त्यांनी प्राचार्य म्हणून अध्यापनाचे कार्य केले आहे.
गीतामाई
कुटिलमती ही चाणक्याची
भातुकलीच्या खेळामधली......
म्हणी: ज्ञानाच्या खाणी
मराठी शुद्धलेखनाच्या सोप्या वाटा
मेघदूत( मराठी अनुवाद )
दत्त लहरी ( स्तोत्राचे मराठी ओवीबद्ध भाषांतर)
महायोगी दत्तभक्त दलादन मुनी यांनी रचलेला "दत्त लहरी" हा संस्कृत स्तोत्र असणारा ग्रंथ.
महान मुनी दलादन यांच्याबद्दलची माहिती अत्यंत अल्प आहे. व्यासांचे समकालीन दत्त साक्षात्कारी ऋषी म्हणून दलादन ऋषींची ओळख.असे असले तरीही नाथ संप्रदायाशी त्यांचा संदर्भ लागतो आणि नाथ संप्रदाय हा सर्वत्र विखुरलेला आहे. त्याचबरोबर दत्तात्रयाचे शिष्य ही सर्वत्र आहेतच.
महायोगी दलादन संचित संस्कृत स्तोत्र प्रथम आद्यक्रांतिकारक कै.वासुदेव बळवंत फडके यांनी प्रकाशात आणले. १०२ श्लोक असलेल्या या स्तोत्राचे १८५ ओवींमध्ये काव्यानुवाद करण्यात आले आणि दत्तलहरी या पुस्तकं रूपात हे संग्रहित करण्यात आले आहे. या संस्कृत स्तोत्राचा काव्यानुवाद करण्याचे भाग्य प्राचार्य रमेश भारदे सर यांना लाभले आहे.
संस्कृत भाषा अवगत नसणारी माझ्यासारखे अनेक मराठी वाचक , दत्तभक्त असतील. त्यांच्यासाठी "दत्त लहरी" म्हणजे पर्वणीच आहे. मराठी अनुवादा विना हे स्तोत्र वाचकांपर्यंत पोहोचलेच नसते. दत्तात्रयाचे महात्म्य सांगणारा एवढा अनमोल ठेवा वाचनापासून वंचित राहिला असता. त्यामुळे भारदे सरांच्या या लेखन कार्यासाठी माझ्यासह असंख्य वाचक प्राध्यापक भारदे सरांचे अजन्म ऋणी राहतील.
मुळात "दत्त लहरीचा" काव्यानुवाद करण्याचा योग श्री रमेश भारदे सरांना कसा चालून आला यालाही एक रोचक पार्श्वभूमी आहे. याची माहिती त्यांनी आपल्या "दत्त लहरी" या पुस्तकात नमूद केली आहे. ही माहिती अशी की, भारदे सरांची भाची अरुंधती देशपांडे यांचे गुरू श्री करंबेळकर गुरू यांना काही श्लोकांचा अन्वयार्थ हवा होता. भारदे सरांचे गितामाई हे पुस्तक त्यांनी गुरूंना वाचनास दिला तेव्हा गीतामाई वाचल्यावर श्री करंबेळकर गुरू यांना असे वाटले की, दलादन मुनी कृत संस्कृत श्लोकांचा मराठी काव्यानुवाद भारदे सर निश्चित करु शकतील आणि त्यांनी हे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी भारदे सरांवर सोपवली.
भारदे सरांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले आणि त्याचे सुरेख फळ म्हणजे दत्त लहरी काव्यानुवाद असंख्य वाचकांच्या समोर आले आहे. खरे पाहता याचे परीक्षण करण्याइतपत माझी पात्रताच नाही. पण अंतर्मनाला छेदून गेलेल्या या दत्त लहरी स्वस्त बसू देत नव्हत्या. हे पुस्तक प्रकाशात यावे, सर्वांच्या वाचनात यावे आणि मुख्य म्हणजे दत्तात्रयाचे चरित्र, कीर्ती, महात्म्य सर्वांपर्यंत पोहोचावे याच मनस्वी इच्छेने या स्तोत्राचे मराठी भाषांतर असणाऱ्या पुस्तकाची माहिती देण्याचा हा अल्पसा प्रयत्न करत आहे.
पहिली ओळ वाचायला सुरुवात केली आणि वाचता-वाचता हळुवार भगवंताचे, श्री दत्तात्रयाचे रूप उलगडत गेले.त्यांचा महिमा समजत गेला. एखादं फूल जसं हळुवार उमलत.... अगदी तसाच याचा अर्थ उकलत गेला.
प्रत्येक ओवी काहीतरी नवीन ज्ञान देऊन जात होती. ओवी वाचताना मन दत्तात्रयाच्या चरणी अधिकाधिक लीन होत जातं आणि मुखातून दत्त लहरी मधील ओवी शब्दबद्ध होत असताना आपसूकच कर जुळून येतात.
दत्ताची कृपा ज्यांच्यावर असते तो गुणवान असतो. पण त्याची अवकृपा झालेला मनुष्य हा गुणवान असूनही त्याला मोल उरत नाही. भारदे सरांनी अगदी हेच आपल्या ३८ व्या ओवी मध्ये अनुवादित केले आहे. ते लिहितात....
दत्तकृपा बरसे ज्यावरी | गुणहीन ठरे गुणवान भारी |
त्याची अवकृपा झाल्यावरी | मूर्ख ठाकरे गुणवान |
दत्तात्रयाचा अवताराचे वर्णन करत असताना आणि त्यांचे गुणगान करत असताना, ते अनुवादित करत असताना मुख्य स्तोत्रला कुठेही धक्का पोहोचू न देता ते अतिशय आशय बद्ध आणि सोप्या भाषेत अनुवादित करणे खरंच कठीण काम आहे. ओवी ८६ ते १५० मध्ये श्री दत्तात्रयाचे अवतार आणि गुणवर्णन खूप सुंदर आणि सहज करण्यात आले आहे.
दत्तात्रयाची सेवा अखंड करत राहिल्याने भक्तास काय फळ मिळते याबद्दलचे वर्णन त्यांनी अतिशय सुंदर रित्या १०९ व्या ओवीत अनुवादित केले आहे.....
करी जो नीत तव चरण सेवा|त्यास मिळे अपार सुख ठेवा|
खान, पान, निद्रा, सुख मिळे देवा | तुझ्या कृपेने |
दत्त लहरी मधील हे स्तोत्र वाचताना मनःशांती मिळते.
भारदे सरांच्या हातून घडलेली ही साहित्य सेवा वाचकांच्या हातात पडताच हा अनमोल ठेवा वाचून वाचकांचे तन आणि मन धन्य होईल आणि वाचकास अपार समाधान मिळेल यात शंकाच नाही.
प्रत्येकाने दररोज एकदा तरी नक्की वाचावे असे .... "दत्त लहरी"(स्तोत्राचे मराठी ओवीबद्ध भाषांतर)
©® मैथिली कुलकर्णी.
टिप्पण्या